करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने शेकडो गरीबांची मदत केली. त्याच्या या मदतीची सर्वत्र स्तुती होत आहे. एका चाहत्याने तर सोनूचे आभार मानत त्याचा फोटो देवाऱ्यात देवाच्या मुर्ती शेजारी ठेवला आहे. हा व्यक्ती दररोज सोनूच्या फोटोची पूजा करतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडओ पाहून सोनू देखील भावूक झाला आहे. “माझी जागा तिथे नाही. तुमच्या हृदयात आहे.” अशा शब्दात त्याने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली.

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.