कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या ‘मनिकर्णिका – द क्वीन ऑफ झाशी’ या चित्रपटात आता अभिनेता सोनू सूदचाही प्रवेश झाला आहे. याआधी सोनू सूदने ‘जोधा अकबर’ आणि ‘शहीद-ए-आझम’ सारख्या ऐतिहासिक चित्रपटांमधून काम केले आहे. त्यामुळे राणी लक्ष्मीबाईंची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे. ‘झी स्टुडिओ’ची निर्मिती असलेल्या क्रिश दिग्दर्शित या चित्रपटात सदाशिव ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा सोनू सूद साकारणार आहे.

गेल्याच आठवडय़ात या चित्रपटासाठी तलवारबाजीचे चित्रिकरण सुरू असताना कंगना राणावतला झालेल्या अपघातामुळे चित्रपट चर्चेत आला होता. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या वेगाने सुरू आहे. आणि आता या टप्प्यावर सोनूची निवड करण्यात आली आहे. राणी लक्ष्मीबाई यांचा सरदार असलेल्या सदाशिवला हाताशी धरून इंग्रजांनी विद्रोहाचा कट रचला होता. त्यामुळे सदाशिवची ही व्यक्तिरेखा चित्रपटात अत्यंत महत्वाची ठरणार आहे. सोनू सूदनेही आपल्या भूमिकेची तयारी सुरू केली आहे.

‘ऐतिहासिक व्यक्तिरेखा असल्याने ही भूमिका आव्हानात्मक असणार आहे. कारण ती व्यक्ती अस्तित्वात होती, त्यामुळे ती कशी वागली-बोलली याचे काही मापदंड ठरलेले असतात. आणि तुम्हाला त्यानुसारच भूमिका साकारायची असते त्यामुळे इतर चित्रपटांपेक्षा ऐतिहासिक भूमिका करताना काळजी घ्यावी लागते’, असे सोनू सूदने म्हटलेोहे. मात्र या चित्रपटाचा दिग्दर्शक क्रिश आणि त्याची संपूर्ण टीम अतिशय अभ्यासू आणि योजनाबध्द पध्दतीने काम करत असल्याने काही गोंधळ होण्याचा प्रश्न येणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.