लॉकडाउनचा कालावधी सुरु झाल्यापासून स्थलांतरित मजुरांना मदत करणारा अभिनेता सोनू सूद सध्या चर्चेत आहे. मात्र त्याच्या नावाने सोशल मीडियावर एक फेक अकाऊंट सुरु झालं असून त्यातून नागरिकांची फसवणूक होत असल्याचं दिसून येत आहे. खुद्द सोनू सूद याने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तसंच या प्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येईल असंही तो म्हणाला आहे.

“सामान्य लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी लवकरच तुम्हाला अटक होईल. त्यामुळे आणखी उशीर होण्यापूर्वीच सुधरा”, असं म्हणत सोनूने ट्विट केलं आहे. सोबतच फेक अकाऊंट असलेल्या खात्याचा आयडीही त्याने शेअर केला आहे.

दरम्यान, या फेक अकाऊंटच्या माध्यमातून गरजू नागरिकांचे फोन नंबर आणि त्यांची अन्य माहिती घेत त्यांची फसवणूक होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील सोनू सूदच्या नावाने अनेक फेक अकाऊंट असल्याचं पाहायला मिळालं होतं.मात्र सोनूने फेक अकाऊंट सुरु करणाऱ्यांना ताकीद दिली आहे.