बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोहिम हाती घेतली आहे. “शेवटचा स्थलांतरित मजूर घरी पोहचेपर्यंत मी ही घर भेजो मोहीम सुरु ठेवणार आहे,” असं सांगणारा सोनू सध्या बराच चर्चेत आहे. सोनूने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची ‘घर भेजो’ मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्याने हजारो मुजरांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवलं आहे. सोनूने केलेल्या मदतीची जाण ठेवत घरी सुखरुप पोहचलेल्या अनेक मजुरांनी त्याचे आभार मानले आहेत. अनेकजण त्याचे आभार मानण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसत आहे. ट्विटवरुन काहीजण त्याचे आभार मानताना वाळू शिल्प बनवत असल्याचे सांगतात तर काहीजण चित्राच्या माध्यमातून सोनूला धन्यवाद देत आहेत. मात्र एका महिलेने सोनूने केलेली मदत आयुष्यभर लक्षात रहावी म्हणून आपल्या मुलाचे नाव ‘सोनू सूद’ असं ठेवलं आहे. यासंदर्भात सोनूनेच माहिती दिल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

१२ मे रोजी सोनूने काही मजुरांना दरभंगाला पाठवलं होतं. त्या मजुरांपैकी दोन महिला गरोदर होत्या. त्यापैकी एका महिलेने नुकताच एक गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्याचे नाव ‘सोनू सूद’ असं ठेवलं आहे. “१२ मे रोजी आम्ही मजुरांची एक बस दरभंगाला पाठवली होती. या बसमध्ये दोन गरोदर महिला होत्या. हे कामगार सुखरुप घरी पोहचले. यापैकी एक महिलेची प्रसुती २७ मे रोजी झाली. याच कुटुंबातील सदस्यांनी मला फोन करुन आम्ही बाळाचे नाव सोनू सूद ठेवलं आहे अशी माहिती दिली,” असं या संदर्भात माहिती देताना सोनू म्हणाला.

“पण तुमचे अडनाव तर श्रीवास्तव आहे तर मुलाचे नाव सोनू सूद कसं असू शकतं? असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावेळी त्यांनी मुलाचे नाव सोनू सूद श्रीवास्तव असं असल्याची माहिती दिली. ते ऐकून मला खूप छान वाटलं,” असं सोनूने बॉम्बे टाइम्सशी बोलताना सांगितलं. याआधीही अशाप्रकारे अडचणीच्या प्रसंगी मदत करणाऱ्यांची नावे मुलांना देण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांना नुकतीच आपत्यप्राप्ती झाली. या बाळाचे नाव जॉन्सन यांनी त्यांच्यावर करोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवत अनोख्या पद्धतीने डॉक्टरांचे आभार मानले. सायमंड्स यांनीच यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन माहिती दिली होती.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउन सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांनी चालत आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याने मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून देशातील अनेक राज्यांमधून मजूर चालत आपल्या राज्यांमध्ये परत जाताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या लॉकडाउनमध्ये श्रमिक विशेष ट्रेन्सच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची सुविधा करण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक श्रमिकांना आपल्या राज्यात जाण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सोनूने पुढाकार घेतला असून तो मुंबईसहीत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या उत्तरेतील मजुरांना घरी पोहचवण्यासाठी बस गाड्यांची सोय करताना दिसत आहे. सोनूकडे थेट ट्विटवरुन मदतीची मागणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या लोकांना सोनू थेट ट्विटवरुन मदत करतानाही दिसत आहे.