लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत बनला. आतापर्यंत त्याने जवळपास २० ते २२ हजार स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवलंय. बस, विमान, रेल्वे यांची सुविधा त्यांनी करून दिली आहे. सोनू सूदच्या या मदतकार्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक आहे. भविष्यात तो राजकारणात येणार की काय अशाही चर्चा होऊ लागल्या आहेत. या चर्चांवर सोनू सूदने उत्तर दिलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने स्पष्ट केलं, “मी राजकारणात असतो तर कदाचित आता जे काही करतोय ते मोकळेपणाने करू शकलो नसतो. मी सध्या जे करतोय त्यात खूश आहे. माझ्या अभिनयाच्या करिअरमध्ये मी खूश आहे. मला गेल्या दहा वर्षांपासून अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर्स आल्या. पण मला राजकारणात जाण्यात रस नाही.” राजकारणात असतो तर मदतकार्य इतक्या मोकळेपणाने करू शकलो नसतो, असं म्हणत त्याने भविष्यात राजकारणात जाण्याच्या चर्चांवर पूर्णविराम लावला.
आणखी वाचा : सोनू सूदची एकूण संपत्ती माहितीये का?
पडद्यावर खलनायक साकारणाऱ्या सोनू सूदला सामान्यांकडून सध्या इतकं प्रेम मिळतंय की भविष्यात त्याला खलनायकी भूमिका मिळू नये अशी प्रार्थना अनेकजण करतायत. खऱ्या आयुष्यात हिरो ठरलेल्या सोनू सूदने शेवटचा स्थलांतरित त्याच्या घरी पोहोचेपर्यंत मदतकार्य सुरू ठेवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 9:54 am