महिला दिग्दर्शिकेच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून अभिनेता सोनू सूदने कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका’ चित्रपट अर्ध्यावरच सोडला अशी त्यावेळी फार चर्चा होती. पण हा चित्रपट सोडण्यामागचं खरं कारण आता सोनू सूदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. कंगना रणौतने अर्ध चित्रपट शूट झाल्यानंतर दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत:वर घेतली होती. त्यानंतर सोनू सूदने हा चित्रपट सोडला होता.

पत्रकार बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं, “गेल्या अनेक वर्षांपासून कंगना माझी मैत्रीण आहे आणि मला तिच्या भावना दुखवायच्या नाहीत. पण जेव्हा मणिकर्णिका चित्रपटाची बरीच शूटिंग पूर्ण झाली होती तेव्हा दिग्दर्शक क्रिश यांना एक ई-मेल आला की ते आता पुढचं दिग्दर्शन करू शकत नाहीत. कंगनाला पुढचं दिग्दर्शन करायचं होतं आणि आम्ही तिला पाठिंबा द्यावा अशी तिची इच्छा होती. कंगनाला पाठिंबा देण्यास नकार नव्हता पण क्रिश यांना पुन्हा सेटवर आणावं अशी माझी मागणी होती. कारण त्यांनी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती.”

आणखी वाचा : ‘त्या’ चुकीच्या निर्णयामुळे ‘गोपी बहु’चं करिअर रातोरात झालं उध्वस्त

कंगनाने दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत:वर घेतल्यानंतर परिस्थिती कशी बदलली याबद्दल सोनू सूदने पुढे सांगितलं, “मी शूट केलेल्या दृश्यांपैकी ८० टक्के दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. मला पुढे जे सीन्स देण्यात आले होते तेसुद्धा अचानक काढून टाकण्यात आले. याविषयी मी कंगनाशी बोललो तेव्हा ती म्हणाली की तिला तिच्या हिशोबाने चित्रपट करायचा आहे. तेव्हा मी तिला सांगितलं की ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे पण तिला ज्याप्रकारे अपेक्षित आहे तसं काम मी करू शकत नाही. सुरुवातीची स्क्रिप्ट आणि सुरुवातीच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यास मी तयार होतो. चार महिने मी मणिकर्णिकासाठी काम केलं होतं आणि त्यासाठी दुसरे प्रोजेक्टसुद्धा नाकारले होते. त्यावेळी मला खूप दु:ख झालं होतं पण मी काहीच बोललो नाही.”

एकावेळी एकाच दिग्दर्शकासोबत काम करण्याचा त्याचा नियम असल्याचं यावेळी सोनू सूदने सांगितलं. “महिला दिग्दर्शक असल्यामुळे काम करण्यास माझा कधीच नकार नव्हता. मी असा कुठेच बोललो नाही. कारण त्याआधी मी फराह खानसोबतही काम केलं होतं. हॅपी न्यू इअर चित्रपटाचं दिग्दर्शन तिनेच केलं होतं. पण एकाच सेटवर दोन दिग्दर्शकांसोबत काम करणं मला शक्य नाही. माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी जितके ८०-९० चित्रपट केले, त्यात एका वेळी एकच दिग्दर्शक होता. त्यामुळे मी त्याच नियमाला धरून पुढेही काम करेन”, असं सोनू सूदने स्पष्ट केलं.