बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाउनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत करत आहे. अनेक कामगारांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्याकडे मदत मागितली होती. त्यामुळे सोनूला दररोज हजारो मेसेज आणि ट्विट येत आहेत. दरम्यान एका चिमुकलीने सोनूकडे अनोखी मागणी केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोनू सूदच्या ट्विटर अकाऊंटवर एका लहान मुलीचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तिने, ‘बाबा थांबा मी विचारते. सोनू काका मी असं ऐकलय की तुम्ही लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत करत आहात. माझे बाबा विचारतायेत, माझ्या आईला तुम्ही आजीच्या घरी पोहोचवू शकाल का?’ असं ती गोंडस मुलगी बोलताना दिसत आहे. चिमुकलीचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.


या चिमुकलीच्या व्हिडीओवर सोनू सूदने देखील मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. ‘हे खूप आव्हानात्मक आहे. मी माझ्या परिने प्रयत्न करतो’ असे म्हटले आहे.

सोनूने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी ट्विटरवर त्याचा फोन नंबर शेअर केला. दिलेल्या नंबरवर त्याने मजुरांना त्यांना कुठे जायचे आहे, ते कुठे अडकले आहेत, एकूण किती लोक आहेत ही सर्व माहिती देण्यास सांगितली होती. पडद्यावरील खलनायक आता खऱ्याखुऱ्या आयुष्यात अनेकांसाठी सुपरहिरो ठरला असल्याचे म्हटले जाते. तो करत असलेल्या कामाची सर्वजण प्रशंसा करत आहेत.