या करोनाच्या कठीण परिस्थितीत जनसामान्यांचा आधार ठरलेला अभिनेता सोनू सूद. अजूनही तो आपल्या परिने लोकांना मदत करत आहे. देशातल्या करोना प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांची कमतरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सोनू लोकांना मदत करत आहे.

सोनूने नुकतंच एक ट्विट केलं आहे. आपल्या या ट्विटमध्ये तो म्हणतो, “२०,६८८हून अधिक विनंत्या आल्या आहेत. काहीजणांसाठी वेळ फार कमी आहे. जर तुम्ही पुरवठादार असाल तर माझं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि गरजूंना मदत करा”.

औषधे, ऑक्सिजनची कमतरता, बेड उपलब्ध नाहीत अशा अनेक समस्यांचा विचार करुन सोनू सूदने आता त्यांनाही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनूने यासाठी टेलिग्राम अॅपवरुन एक नवा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. त्याने ट्विट करत याबद्दल माहिती दिली होती.

आपल्या या ट्विटमध्ये तो म्हणतो, “आता संपूर्ण देश एकत्र येईल. माझ्यासोबत टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून इंडिया फाईट्स विथ कोविड या मोहिमेत स्वतःला जोडून घ्या”. या मोहिमेच्या माध्यमातून सोनू गरजू लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड, औषधे आणि ऑक्सिजन उपलब्ध करुन देणार आहे. त्याचं हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.

नुकतंच लस बनवणारी कंपनी सिरम इन्स्टिट्युटने कोविशिल्ड या लसीची नवी किंमत जाहीर केली. त्यानुसार, राज्य सरकारांना ही लस ४०० रुपयात मिळणार असून खासगी रुग्णालयांना या लसीसाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. यावर सोनूने ट्विट केलं होतं. त्यात तो म्हणतो, “प्रत्येक गरजू व्यक्तीला लसीचा डोस मोफत मिळायला हवा. किंमत ठरवून देणं फार गरजेचं आहे. जे कोणी लस खरेदी कऱण्यासाठी सक्षम आहेत त्यांनी पुढे येऊन मदत करायला हवी. व्यवसाय नंतर कधीतरी करुयात”.