करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. परंतु यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. आतापर्यंत त्याने शेकडो मजुरांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. त्याच्या या कामाची सर्वत्र स्तुती होत आहे. दरम्यान सोनूच्या कामाचं कौतुक करण्यासाठी चाहत्यांनी गावातील तलावाचं नाव चक्क सोनू सूद ठेवलं आहे. या कौतुकावर सोनूने देखील गंमतीशीर प्रतिक्रिया देऊन त्यांचे आभार मानले आहेत.

अवश्य पाहा – ३० वर्षीय अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी सुरू केली चौकशी

“सर आम्ही आमच्या या लहानश्या तलावाचं नाव सोनू सूद ठेवलं आहे. हे तलाव तुमच्याप्रमाणेच शेकडो सजीवांना जीवनदान देतं.” अशा आशयाचं ट्विट करुन चाहत्यांनी सोनूवर कौतुकाचा वर्षाव केला होता. हे कौतुक पाहून सोनू देखील भारावला. “या सोनू सूदला भेटण्यासाठी मी नक्की येईन.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ‘दिल बेचारा’मुळे अनुपम खेर यांच्या डोळ्यांतून वाहू लागले अश्रू; म्हणाले…

सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.