लॉकडाऊनच्या काळात अनेक प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद आजही वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आता सर्व पूर्वपदावर येत असतानाही सोनू सूदकडून होत असलेले मदत कार्य अजूनही सुरूच आहे. नुकतीच सोनूने पॉपकॉर्न विकणाऱ्या एका मुलाला मदत केली आहे. सध्या ऑनलाइन शिक्षणाच्या काळात हा मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सोनूने त्याला मोबाईल गिफ्ट केला आहे.

ट्विटरवर एका यूजरने सोनू सूदकडे पॉपकॉर्न विकणाऱ्या मुलाला ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी स्मार्टफोन घेऊन देण्याची विनंती केली होती. ‘सर कृपया याची मदत करा. हप्पी त्याच्या वडिलांना मदत करण्यासाठी पॉपकॉर्न विकत आहे. मी जेव्हा पासून हप्पीला भेटले आहे तेव्हा पासून त्याला शिक्षण घेण्यास मदत करत आहे. त्याची फि भरण्यासाठी मदत करत आहे. आता त्याचे ऑनलाइन क्लासेस सुरु झाले आहेत आणि त्याच्याकडे स्मार्टफोन नाही’ असे एका यूजरने म्हटले होते.

त्यावर सोनू सूदने उत्तर देत हप्पी तुला फोन मिळेल पण तू मला पॉपकॉर्न पार्टी दिली तर असे म्हटले आहे.

त्यानंतर त्या यूजरने हप्पीला १० तासात फोन मिळाला आणि आता तो ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतो. आता तुम्ही पॉपकॉर्न पार्टीसाठी कधी येणार असे त्या यूजरने विचारले आहे.

यापूर्वी ही सोनू सूदने अनेकांना दिलेल्या उत्तराच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी एका यूजरने प्लेस्टेशन मागितले होते. सोनू सूदने त्याला प्लेस्टेशन न देता पुस्तके देऊन मदत केली होती. तसेच त्याने एका गरीब शेतकऱ्याला ट्र्रॅक्टर भेट म्हणून दिली होता. तर करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नोकरी गेल्यामुळे भाजी विकणाऱ्या मुलीला मदत केली होती. तिला नवी नोकरी मिळवून दिली होती.