दिलीप ठाकूर
‘सौतन’ (१९८३) असे चित्रपटाचे नाव घेताक्षणीच अनेकांना तरी राजेश खन्ना व टीना मुनिमचे ‘इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है…’ हे खेळकर आणि खोडकर प्रेमगीत आठवले असणार. पण हा ‘सौतन की सौतन’ चित्रपट कुठला बरे असा प्रश्न नक्कीच पडला असणार. काही फिल्म दीवाने तर म्हणतील, ‘सौतन’चेच निर्माता-दिग्दर्शक सावनकुमार टाक यांचा ‘सौतन की बेटी’ (१९८९) आठवतोय. जीतेंद्र, रेखा, जयाप्रदा व नवतारका दीपीन्ती यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. पण या चित्रपटाला कोणत्याच बाबतीत ‘सौतन’ची सर नव्हती हे देखिल काहीजण आठवणीने सांगतील.

पण तरी प्रश्न कायम राहतोच, हा ‘सौतन की सौतन’ चित्रपट कुठला बरे? बरं तो देखील दिग्दर्शक सावनकुमार यांचाच तर आहे. या छायाचित्रात तर सावनकुमार यांच्यासह निर्माता राकेश मोहन, माधवी, जयाप्रदा आणि तिचा नवरा श्रीकांत नाहटा हे सगळेच दिसताहेत. या ‘सौतन की सौतन’ (१९९२) चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळचा हा उत्साहवर्धक क्षण आहे. पण मग या चित्रपटाचे पुढे झाले काय असा प्रश्न असणे स्वाभाविक आहेच . त्याचे उत्तर आहे, हा चित्रपट फक्त मुहूर्तापुरताच राहिला. तसे तर अनेक चित्रपटांबाबत घडतेच. पण येथे तेवढेच घडले नाही.

आपल्या एखाद्या सुपर हिट चित्रपटाच्या प्रेमात रमण्यात काही निर्माता-दिग्दर्शकाना भरपूर आनंद मिळतो आणि मग ते त्याच पठडीतील चित्रपट निर्माण करतात. जे. पी. दत्तानेही ‘बाॅर्डर’च्या यशानंतर ‘एलओसी कारगिल’ काढला आणि आता ‘फलटण’ निर्माण करतोय.

सावनकुमारनेही तेच केले हा या चित्रपटसृष्टीचा जणू स्वभावच आहे. पण हा तिसरा (की तिसरी?) सौतन जरी बंद पडला तरी सावनकुमारने लगोलग पुढचे पाऊल टाकले. जीतेंद्र व जयाप्रदा यांना त्यानी करारबद्ध केले होतेच. त्यांच्या जोडीला अनू अग्रवालला घेतले आणि ‘खलनायिका’ (१९९३) बनवला. गंमत म्हणजे, सुभाष घईच्या ‘खलनायक’च्या निर्मितीशी स्पर्धा करीतच त्यानी ‘खलनायिका’ निर्माण केलादेखील.