आचार्य अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांच्या आयुष्यावर आता बायोपिक येतो असे समजते आहे. अभिनेता आणि लेखक राजेश देशपांडे आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार हे दोघे मिळून या सिनेमाचे लेखन करत असल्याची चर्चा आहे.  श्रीकांत बोजेवार यांनी शेअर केलेल्या फेसबुक स्टेटसमुळे ही माहिती समोर आली. दरम्यान ही बातमी समोर येताच चर्चा सुरू झाली आहे ती सुबोध भावेच्या नावाची कारण सध्या मराठीतला ‘बायोपिक स्टार’ एकच आहे सुबोध भावे. त्यामुळे सुबोध भावे आचार्य अत्रेंची भूमिका साकारणार का? याबाबत आता सिनेविश्वात चर्चा रंगली आहे.  सुबोध भावे या कलाकाराने आत्तापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीतले सर्वाधिक बायोपिक साकारले आहेत. मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘..आणि काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमातही ‘काशिनाथ घाणेकरां’ची भूमिका सुबोध भावेनेच साकारली होती.

एवढंच नाही तर ‘लोकमान्य-एक युगपुरुष’ या सिनेमात सुबोध भावेने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली होती. तर ‘बालगंधर्व’ सिनेमातली नारायणराव बालगंधर्वांची भूमिकाही सुबोध भावेनेच साकारली होती. सुबोधने साकारलेल्या या भूमिकांचं कौतुकही झालं. ‘कट्यार काळजात घुसली’ या अभिजात संगीत नाटकावरचा सिनेमाही सुबोध भावेने दिग्दर्शित केला आणि त्यातली सदाशिव ही भूमिकाही साकारली. या सिनेमाचंही मराठी प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. आता आचार्य अत्रे यांच्या आयुष्यावर बायोपिक आला तर त्यासाठी सुबोध भावेच्या नावाची चर्चा होणं स्वाभाविकच आहे. तशी ती सुरूही झाली आहे. एका मुलाखतीत सुबोध भावेने सांगितलं होतं की मला कोणतीही भूमिका वर्ज्य नाही. जी भूमिका मला ऑफर केली जाते त्याचा विचार करतो, ती स्वीकारण्यासारखी असेल तर नक्की स्वीकारतो असं त्याने म्हटलं होतं.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्यावरही बायोपिक येऊन गेला. दोन भागांमध्ये हा बायोपिक होता. ‘भाई-व्यक्ती की वल्ली?’ पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे ते दोन भाग होते. त्यामध्ये अभिजित चव्हाण या अभिनेत्याने ‘आचार्य अत्रे’ साकारले होते. मात्र पुलंच्या आयुष्यावर असलेल्या बायोपिकमध्ये अत्रेंची काही वेळाची भूमिका साकारणं आणि संपूर्ण चित्रपट आचार्य अत्रेंच्या आयुष्यावर बेतलेला असणं या दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे आचार्य अत्रे यांची भूमिका हे एक आव्हान आहे. आचार्य अत्रे हे शिक्षक, लेखक, पत्रकार, नाटककार, चित्रपटकार होते. समाजातल्या घडामोडींवर मार्मिक भाष्य करणाऱ्या कलाकृती त्यांनी घडवल्या. ‘तो मी नव्हेच!’ सारखं अजरामर नाटक असो किंवा ‘बुवा तिथे बाया’ नाटकासारखा फार्स असो, ‘एकच प्याला’चे विडंबन असो प्रत्येक कलाकृतीतून अत्रेंनी त्यांच्या खास शैलीत समाजातलं व्यंग टिपून त्यावर प्रहार केले आहेत.

पु.ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे ही महाराष्ट्रातली अशी दोन नावं आहेत ज्यांच्या पुस्तकांमधील लिखाणाचे संदर्भ घेऊन जगलेली पिढी महाराष्ट्रात आहे. आचार्य अत्रे यांनी ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ ही दोन दैनिकंही सुरू केली होती. नवयुग सुरू केलं त्यावेळी अत्रे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे या वृत्तपत्रातून काँग्रेसची विचारसरणी मांडली जात होती. आचार्य अत्रे यांची भूमिका साकारणं हे त्यांच्या कलाकृतींइतकंच मोठं आव्हान आहे. ‘कऱ्हेचं पाणी’ हे त्यांचं आत्मचरित्रही पाच खंडात आहे. यावरूनच त्यांच्या आयुष्याचा आवाका किती मोठा होता हे लक्षात येते. याशिवाय ‘अशा गोष्टी, अशा गंमती’, ‘कावळ्यांची शाळा’, ‘फुले आणि मुले’ हे त्यांचे कथासंग्रहही गाजले.

आता असं अफाट व्यक्तिमत्त्व असलेल्या माणसावर बायोपिक येण्याचे घाटत आहे. अडीच ते तीन तासांमध्ये त्यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणं हे फक्त आव्हान नाही तर शिवधनुष्य आहे. समजा चित्रपटाला परवानगी मिळाली आणि तो लिहून पूर्ण झाला तर त्यानंतरच त्या सिनेमात अत्रेंची भूमिका करण्याबाबत निर्णय घेतला जाईल आणि जाहीर होईल.

सुबोध भावेने ‘बालगंधर्व’ सिनेमातली बालगंधर्वांची भूमिका साकारताना त्यात प्राण ओतले होते. आपल्याला या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याचीही खंत त्याने बोलून दाखवली होती. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नसला तरीही या भूमिकेचे आणि त्याने पेललेल्या आव्हानाचे सगळीकडून कौतुक झाले. सुबोध भावेने एखादी भूमिका करायची ठरवली तर त्याचा तो पूर्ण अभ्यास करतो, भूमिकेसाठीची मेहनत घेतो. समजा आचार्य अत्रेंच्या आयुष्यावरच्या बायोपिकला परवानागी मिळाली आणि तो आला आणि समजा तो सुबोधने स्वीकारला तर त्याला तो न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल यात तूर्तास तरी शंका नाही.

आणखी एक महत्त्वाचा भाग असा की आचार्य अत्रेंच्या ‘श्यामची आई’ या आचार्य अत्रे दिग्दर्शित पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. जर सुबोध भावेने अशा आचार्य अत्रेंच्या संभाव्य बायोपिकमध्ये त्याने अत्रेंची भूमिका साकारली तर त्याला न मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराची खंतही दूर होण्यास मदत होऊ शकते. तूर्तास तरी या सगळ्या चर्चाच आहेत. आचार्य अत्रेंची भूमिका कोण करणार हे निश्चित झालेले नाही कारण त्यांच्या आयुष्यावर बायोपिक येतो आहे हीदेखील नुसती चर्चाच आहे. त्यामुळे बायोपिक म्हटल्याने सुबोध भावेचे नाव पुढे येते आहे हे नक्की!

समीर चंद्रकांत जावळे

sameer.jawale@indianexpress.com

तळटीप : आचार्य प्र. के. अत्रे यांच्या आयुष्यावरील जीवनपटासाठी त्यांच्या वारसांकडे अद्याप कोणतीही संमती मागण्यात आलेली नाही व कुणासही अशी संमती देण्यात आलेली नाही असे मीना देशपांडे आणि राजेंद्र पै यांनी लोकसत्ता ऑनलाइनला मेल पाठवून स्पष्ट केले आहे.