भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात रोवली. आजही जास्तीत जास्त चित्रपट, मालिका, जाहिराती यांची निर्मिती मुंबईत होताना दिसते. यासाठी चित्रीकरणाच्या आवश्यक त्या सोयी-सुविधाही महाराष्ट्रात विकसीत झाल्या. महाराष्ट्राला समृध्द असा नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभला आहे. मात्र याचा चित्रिकरणाच्या दृष्टीने पुरेपूर क्षमतेने वापर होताना दिसून येत नाही. म्हणूनच शासनाने, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १०० महत्त्वाच्या चित्रीकरण स्थळांची माहितीपुस्तिका तयार केली आहे.

‘स्पॉटलाईट’ असे या माहितीपुस्तिकेचे नाव असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. यामध्ये समुद्र किनारे, गडकिल्ले, गुहा, धबधबे, जंगल, खेळ, साहस, धार्मिक, ऐतिहासिक स्थळे-स्मारके, संग्रहालये इत्यादींचा समावेश आहे. तसेच या प्रत्येक स्थळाचा सविस्तर तपशील, नकाशातील स्थान व ऐतिहासिक महत्व तसेच हवामान, दळणवळण, चित्रीकरणासाठीचा संपूर्ण तपशील, उपलब्ध सोयी सुविधा इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

VIDEO : ‘टार्झन..’ फेम वत्सल सेठ लग्नबंधनात अडकला

ही पुस्तिका जगभरातील महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी उत्सुक निर्माते व निर्मिती संस्थांकरिता एक रेडी रेकनर म्हणून उपयुक्त ठरू शकेल. या माहितीपुस्तिकेमुळे जगभरात महाराष्ट्र हे एक ‘चित्रपट स्नेही’ राज्य म्हणून नावारुपास येण्यास निश्चितच सहाय्य होईल.