गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून देशात लॉकडाउन असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील कामकाज ठप्प झालं होतं. सहाजिकच याचा परिणाम कलाविश्वावरही झाला. नाटक, मालिका, चित्रपट या साऱ्यांचं चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. मात्र आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने पावलं वळू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या मालिका, चित्रपट, नाटक पाहण्यास प्रेक्षक वर्ग आतूर झाला आहे. यातच अभिनेत्री स्पृहा जोशीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे अनेकांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. विशेष म्हणजे केवळ चाहत्यांचं लक्ष वेधलंच नाही तर त्यांच्या मनात काही संभ्रमदेखील निर्माण झाले आहेत.

स्पृहाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा प्रोमो व्हिडीओ असून त्यात ‘शुभारंभाचा प्रयोग’ असं लिहिण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये १२ जुलै रोजी नाट्यगृहात असंही नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाट्यगृहांचे दरवाजे खुले होणार का असा प्रश्न नाट्यरसिकांना पडला आहे.

शुभारंभाचा प्रयोग याविषयी प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत.नेमकी ही संकल्पना काय आहे?, हे नाटक आहे का?, त्याचे दिग्दर्शक कोण?, कलाकार कोण?, खरंच नाट्यगृह सुरु होणार का? हे आणि असे असंख्य प्रश्न नाट्यरसिकांना पडले असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पृहाला हे प्रश्न विचारले आहेत. मात्र या प्रकरणी स्पृहाने अद्यापतरी कोणताच खुलासा केला नसून या सगळ्या प्रश्नांची उत्तर १२ जुलै रोजी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.