मराठी नाटय़सृष्टी ही नेहमीच नवनव्या कलाकृतींना आणि नव्या संकल्पनांना जन्म देणारी जन्मदात्री म्हणून जगप्रसिद्ध आहे. पण त्या सगळ्या कलाकृतींमध्ये दोन गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. एक म्हणजे प्रेम आणि दुसरी म्हणजे नातेसंबंध. कधी कधी या दोन्ही संकल्पनांना एकत्र करून त्यातून नवीन नाटकाची निर्मिती होते, तर कधी कधी त्या दोन्ही संकल्पना स्वतंत्रपणे हाताळल्या जातात. पण फार कमी वेळा असं होतं की त्या दोन्ही संकल्पना विरुद्धार्थी अर्थाने एकत्र जमवून त्यांचा मेळ साधून एखादी नाटय़कृती तयार होते. याचाच अर्थ प्रेम आणि नातेसंबंध म्हटल्यावर दोन विरुद्धिलगी व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल प्रेमभावना निर्माण होऊन त्यांच्यात नातं निर्माण होतं. ही झाली सर्वसाधारण व्याख्या. पण काही लेखक याला अपवाद आहेत. आणि दोन प्रेम करणारी मंडळी फक्त प्रेम न करता त्यांच्यात प्रेम सोडून अजून दुसरं काही असू शकतं, आणि त्यातूनच त्यांचं नातं अधिक फुलू शकतं, अशी संकल्पना आकाराला येते. नेहमीच्या धाटणीपेक्षा जरा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या कलाकृती अनेकदा यशस्वीही होतात आणि जाता जाता प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजनही घालतात.
असाच एक उत्तम प्रयत्न केलाय सोनल प्रॉडक्शन निर्मित ‘डोण्ट वरी, बी हॅपी!’ या नाटकाने. वरील परिच्छेदात उल्लेखिलेल्या सगळ्या गोष्टी या नाटकाला चपखल लागू होतात. हे नाटक म्हणजे प्रेम आणि नातेसंबंध दोन्ही दाखवतं. पण कदाचित तुम्ही विचारही केला नसेल अशा प्रकारे यातील पात्रांच्या नातेसंबंधांची येथे उलगडणी होते. यातून तुम्हाला कदाचित प्रेमाचा वेगळा अर्थ समजू शकतो किंवा नातेसंबंधांबद्दल एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त होऊ शकतो. या नाटकाची कथा एका सर्वसामान्य घरातील आजच्या तरुणाईची वाटली तरी त्यातील नात्यांची तरलता आणि प्रेमाची दाहकता या सूत्रावर हे नाटक छान तारेवरची कसरत करते.

वाचा : शूटर गुलशन कुमारांवर गोळ्या झाडताना अबू सालेम फोनवरून ऐकत होता किंकाळ्या…

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

नाटकाचं कथानक अक्षय (उमेश कामत) आणि प्रणोती (स्पृहा जोशी) या लग्न झालेल्या तरुण जोडप्याभोवती फिरतं. अक्षय एका सर्वसामान्य ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा. (सर्वसामान्य ऑफिस म्हणजे ज्या ऑफिसचा बॉस नेहमीच खडूस असतो) आणि प्रणोती टीव्ही मालिकांचं दिग्दर्शन करणारी मुलगी. अर्थात दोघांनाही कामाचा ताण असतोच. त्यांचा प्रेमविवाह असल्याने त्यांच्यात प्रेम, जिव्हाळा आपसूक हे सगळं असतंच. पण दिवसेंदिवस कामाच्या ताणामुळे दोघांनाही एकमेकांना द्यायला खूप कमी वेळ मिळतो. त्यामुळे चिडचिड, भांडण हे ओघाने आलंच. लग्न उलटून गेल्यावर अर्थात काही काळ उलटलेला असतो त्यामुळे ‘घरच्यांना मूल हवं’ वगरे हा प्रकार असतो. पण त्यांच्याकडून काही कारणाने हे प्रकरण काही पूर्ण होत नाही. काही काळाने त्यांना कळतं की त्यांना मूल न होण्याची कारणं वेगळी आहेत. आणि मग त्यांच्यावर जो प्रसंग गुदरतो, त्यावर ते कसे मात करायला जातात आणि पुन्हा खोल गत्रेत कसे अडकतात, सुटतात आणि त्यातून त्यांचे नातेसंबंध कसे उलगडत किंवा मिटत जातात याचा सापशिडीचा रंगलेला खेळ म्हणजे ‘डोण्ट वरी, बी हॅपी’ हे नाटक.
अक्षयची भूमिका साकारणाऱ्या उमेश कामतने उत्तम अभिनय केला असून त्याच्या विनोदनिर्मितीमध्ये कमालीची सहजता या नाटकातून दिसून येते. एक सहनशील नवरा दाखवताना करावी लागणारी धावपळ, भाबडेपणा आणि एक प्रेमळ व्यक्ती त्याने छान साकारली आहे.

वाचा : परेश रावलसह सर्व भारतीय गोमूत्र पिणारे, पाकिस्तानी समर्थकाची टिवटिव

प्रणोतीची भूमिका साकारणाऱ्या स्पृहा जोशी हिचा अभिनय लक्षणीय झाला आहे. सतत स्त्रीवादी भूमिका मांडून गंमत आणणारी, तितकीच प्रेम करणारी पण खोडकर, आणि काही प्रसंगांत कणखर, समंजस अशा अभिनयाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी भूमिका तिने उत्तम हाताळली आहे. इतक्या सगळ्या छटा एखाद्या भूमिकेत क्वचितच सापडतात. पण हे एक प्रकारचं आव्हान तिनं लीलया पेललंय. त्यांच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या आशुतोष गोखले यानेही भूमिकेस न्याय दिला आहे. लेखक मिहीर राजदा यांनी एक वेगळा विषय अत्यंत खुबीने हाताळला आहे. त्यांच्या लिखाणातील हलकेफुलके पण फ्रेश असे विनोद प्रेक्षागृहाला छान हसत खेळत नाटक एन्जॉय करायला लावतात. दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनीसुद्धा नाटकास पूरक असे दिग्दर्शन केले असून काही जागा अचूक हेरल्या आहेत. एक कौटुंबिक नाटक पूर्णविरामावर आणताना त्यातून बोध कसा अप्रत्यक्ष द्यायचा हे त्यांना उत्तम जमलंय. नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य लाजवाब. एका फ्लॅट स्टेजवर हॉल, स्वयंपाकघर, बेडरूम या तिन्ही जागा एका दृष्टिक्षेपात कशा दिसतील आणि त्या व्यक्तिरेखांचा विचार करता कशा असतील हे त्यांनी अचूक हेरून साकारलं आहे. प्रकाशयोजना मात्र अजून उठावदार करता आली असती. प्रकाशयोजनेचा प्रसंगावर फार परिणाम दिसून येत नाही. संगीतही साजेसं आणि पूरक झालंय. साई-पियुष यांनी केलेलं संगीत कुठेच खुपत नसलं किंवा ब्लँक वाटत नसलं तरी त्यात अजून प्रयोग करून संगीत प्रसंगानुसार अधिक उठावदार करता आलं असतं. एक परिपूर्ण उत्तम नाटक होण्यासाठी याचीही गरज भासू शकते. पण संगीत साजेसं आहे इतकं मात्र खरं. नेपथ्याला न्याय देण्यासाठी अमोघ फडके यांनी त्यांच्या प्रकाशयोजनेचा अजून उत्तम प्रकारे वापर करायला हवा होता असं राहून राहून वाटतं.

एकूणच हे नाटक म्हणजे तरल भावनांचा घेतलेला मागोवा आहे. हे नाटक रोजच्या जगण्याचं प्रतिनिधित्व करत असताना रोजच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना कशा प्रकारे सामोरं जाऊन टेंशन न घेता त्यावर कशी मात करायची याचं बाळकडू पाजतं. एकूणच तुम्हाला टेंशन असेल आणि टेंशन फ्री होऊन आनंदी व्हायचं असेल तर हे नाटक पाहायलाच हवं. कारण या नाटकाचं नावच आपल्याला आश्वस्त करतं, ‘डोण्ट वरी, बी हॅपी!’

सौरभ नाईक – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा