केरळमधील पुरग्रस्तांची स्थिती दिवसेंदिवस कठिण होत चालली आहे. याठिकाणी निसर्गाने रौद्र रुप धारण केल्याचे पहायला मिळत आहे. जगभरातून केरळमध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येत आहे. यामध्ये सर्वच स्तरातील लोकांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. मनोरंजन क्षेत्रही याला अपवाद नाही. केरळसाठी स्टार इंडिया आणि स्टार प्रवाहने मदतीचा हात पुढे केलाय. आपण केरळमधील पूरग्रस्तांना २ कोटींची मदत करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता या रकमेत भर पडली असून आता ५ कोटींपर्यंत मदत करण्यात येणार आहे.

स्टार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर के माधवन यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याकडे नुकताच ५ कोटींचा मदतनिधी सुपूर्द केला. केरळमध्ये मागील १०० वर्षातील सर्वात भीषण महापूर आल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. यामध्ये असंख्य जणांचा मृत्यू झाला असून बेघर झालेल्यांची संख्याही मोठी आहे. स्टार इंडिया आणि 21st Century Fox यांच्या पुढाकारातून हा मदतनिधी उभारण्यात आलाय. यासाठी विशेष कॅम्पेन राबविण्यात येत आहे. चॅनेलने अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले आहे. यामध्ये साधारण ६० कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

स्टारसारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करुन केलेल्या या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे 21st Century Fox चे अध्यक्ष उदयशंकर यांनी व्यक्त केली. तर स्टार इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर के माधवन म्हणाले, केरळमधील सध्याची परिस्थीती खूपच चिंताजनक आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी जितकी मदत करणं शक्य आहे तितकी स्टार इंडियाच्या माध्यमातून केली जाईल. यासाठी आम्हाला नागरिकांचा प्रतिसाद मिळणेही तितकेच गरजेचे आहे.