आता दुपारीही मालिकांचा ‘प्राइम टाइम’!
फार वर्षांपूर्वी.. टेलिव्हिजन नामक आटपाट नगरीत संध्याकाळी पाच-साडेपाच वाजले की एकता कपूर यांच्या महामालिकांचे सूर घराघरातून आळवले जायचे. त्या क्षणापासून हातात रिमोट घेतलेला प्रेक्षकवर्ग सलग रात्री नऊ वाजता ‘प्राइम टाइम’ची मालिका संपवूनच ताटावरून उठायचा. पण वाहिन्यांच्या आपसातील वाढत्या स्पर्धेने नऊ वाजताची प्रेक्षकांची टेलिव्हिजन संचापासून मुक्त होण्याची वेळ आणखी पुढे ढकलली गेली. सध्या प्रेक्षक मालिका संपल्या की थेट झोपण्यासाठी बिछान्यात शिरतात. मात्र मनोरंजन क्षेत्राच्या मानेवर बसलेले हे स्पर्धेचे जू इतके बळकट आहे की आता मालिकांचा हा प्राइम टाइम थेट दुपारपासून सुरू होणार आहे. दिवसभरात आपल्या मालिकांचे तेच भाग पुन:प्रक्षेपित करण्यापेक्षा दुपारी प्रेक्षकांना सरसकट नव्या मालिका देण्याचा निर्णय एका वाहिनीने जाहीर केला असून लवकरच इतर वाहिन्याही याचीच री ओढण्याची चिन्हे आहेत.
‘स्टार प्लस’ वाहिनीवर सध्या ‘प्राइम टाइम’ मालिकांचा रतीब रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू असतो. तसेच या मालिका दिवसभरात दोनदा प्रक्षेपित केल्या जातात. प्रेक्षकांनाही याची सवय असल्याने रात्रीच्या वेळेचा एखादा भाग पाहता नाही आला तरी, दुसऱ्या दिवशी त्यांना तो पाहता येतो. मात्र, दुपारी आदल्या दिवशीच्या मालिकेचा शिळा भाग पाहण्याची प्रेक्षकांची सवय मोडून काढण्याचा निर्णय ‘स्टार प्लस’ने घेतला आहे. ‘स्टार प्लस दोपहर’ हा नवीन विभाग त्यांनी सुरू केला असून टेलिव्हिजनवर लोकप्रिय असलेल्या मालिकांचे लेखक आणि निर्मिती संस्था यांच्या मदतीने दुपारच्या वेळेत चार नवीन मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर दाखल होणार आहेत. ‘दुपारच्या मालिका’ ही प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन संकल्पना ठरणार आहे. ‘सध्या प्रेक्षकांचा कल पाहता खूप मोठा प्रेक्षकवर्ग दुपारच्या वेळी घरी असतो. त्यांना वाहिनीकडे वळवण्यासाठी दुपारच्या वेळी चार पूर्णपणे नवीन मालिका प्रक्षेपित करण्यात येणार आहे,’ असे ‘स्टार इंडिया’चे अध्यक्ष गौरव बॅनर्जी यांनी सांगितले.
नवे काय?
‘स्टार दोपहर’अंतर्गत ‘दिया और बाती हम’ या ‘स्टार प्लस’च्या गाजलेल्या मालिकेचा सिक्वल ‘तू सूरज मैं साँझ, पियाजी’ नावाने येणार आहे. त्यापाठोपाठ ‘फातेमागुल’ या तुर्की मालिकेचा देशी अवतार ‘क्या कसूर है अमला का’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, देवाविषयी कुठलीही आस्था न बाळगणाऱ्या तरुणीची कथा ‘एक आस्था ऐसी भी’ या नावाने तर दोन ‘वजनदार’ प्रेमी जीवांची कथा ‘ढाई किलो प्रेम’ नावाने दिसणार आहे.
डिजिटायझेशनची प्रक्रिया गावागावातून पूर्ण होत व्हायच्या टप्प्यावर असल्याने एक मोठा प्रेक्षकवर्ग टेलिव्हिजनशी नव्याने जोडला गेला आहे. त्यातील अनेक प्रेक्षक दुपारीही टीव्ही बघतात, हे सर्वेक्षणातून सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यासाठी म्हणून ही दुपारच्या मालिकांची धाडसी संकल्पना आपण प्रत्यक्षात राबवत आहोत.
– नारायण सुंदररमण, महाव्यवस्थापक स्टार प्लस
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2017 1:26 am