हॉलिवुड सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग व ऑस्कर पुरस्कार विजेता लिओनार्दो दी कॅप्रिओ हे दोघे मिळून अगामी चित्रपटाचे नियोजन करत आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित नाही. परंतु ‘द ग्रँट’ या नावाचा विचार केला जात असल्याची माहिती स्पिलबर्ग यांनी दिली आहे. याआधी २००२ साली ‘कॅच मी ईफ यु कॅन’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर आज तब्बल १७ वर्षांनंतर ‘द ग्रँट’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे ऑस्कर विजेते कलाकार एकत्र येत आहेत. अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँट यांच्या आयुष्यावर आधारित हा आत्मचरित्रपट असणार आहे.

अमेरिकेतील कॉन्फेडरेट संस्थाने संपुष्टात आणणाऱ्या ‘ग्रँट’ यांचा देशाच्या आर्थिक व सामाजिक पुनर्बांधणीत सिंहाचा वाटा होता. त्यांनी यादवी युद्धादरम्यान अमेरिकन सैन्याचे सेनापती पदही भुषवले होते. पुढे ते अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष झाले. १८व्या शतकात अमेरिकेने केलेल्या प्रगतीत ‘ग्रँट’ यांचे अमूल्य योगदान आहे. परंतु हा प्रवास इतका साधा सोपा नव्हता. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. देशाचे नेतृत्व करताना त्यांना अनेक प्रकारच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय समस्यांना देखील सामोरे जावे लागले होते. परंतु कठीण परिस्थितीतही ते डगमगले नाहीत.

युलिसिस एस. ग्रँट यांची ही यशोगाथा या चरित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग करणार आहेत. स्पिलबर्ग सध्या ‘ग्रँट’ यांच्या वैयक्तिक आयुष्यावर संशोधन करत आहेत. दरम्यान, त्यांनी चित्रपटाच्या पटकथेवरही काम सुरु केले आहे. २०२० पर्यंत हा चरित्रपट तयार करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.