अमिताभ बच्चन आणि किमी काटकर यांचं सर्वात सुपरहिट ठरलेलं गाणं म्हणजे ‘जुम्मा-चुम्मा दे दे’. आजही या गाण्याची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. हम चित्रपटातलं हे गाणं त्याकाळी तुफान गाजलं. या गाण्यात कमालीचा जोश, उत्स्फूर्तपणा, आक्रमकता या सगळ्यांचं जणू मिश्रणचं पाहायला मिळतं.मात्र, प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या या गाण्यासाठी एका प्रसिद्घ गायकाला तब्बल १७ तास उपाशी रहावं लागलं होतं.
‘नवभारत टाइम्स’नुसार, ‘जुम्मा-चुम्मा’ हे सुपरहिट गाणं प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी गायलं होतं. या गाण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती.मात्र, शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हे गाणं प्रदर्शित होताच सुपरहिट झालं.

“त्याकाळी लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या घरी माझ्याकडून गाण्याचा रियाज करुन घेतला. त्यावेळी कधी १-१ ओळ तर कधी २-२ ओळी असं करुन ते विविध पद्धतीने माझ्याकडून सराव करुन घेत होते. मात्र, हे गाणं केवळ १२दिवसांमध्ये तयार झालं होतं आणि या गाण्याचा अंतरा आनंद बक्शी यांनी लिहिला होता. विशेष म्हणजे ज्यावेळी संपूर्ण गाणं बसवलं गेलं त्यावेळी लक्ष्मीकांत यांच्या घरी अमिताभ यांना बोलावण्यात आलं. ते आल्यानंतर मायक्रोफोनवर मी त्यांना माझ्या आवाजातील गाणं ऐकवलं. त्यावेळी माझा आवाज ऐकल्यानंतर लगेच रेकॉर्ड करा असं त्यांनी सांगितलं”, असं सुदेश भोसले म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “ज्या दिवशी गाण्याचं रेकॉर्डिंग होतं, त्यादिवशी सकाळी ९ वाजता जवळपास ८० वादक सेटवर हजर होते. तब्बल १७ तास या गाण्याच्या रेकॉर्डिंगला लागले. त्यामुळे रात्री २ वाजता आम्ही पॅकअप केलं. खरंतर या १७ तासांमध्ये मी अन्नाचा एकही कण घेतला नव्हता. फक्त चहा पित होतो. त्यावेळी काम करण्याचा उत्साह होता आणि सोबतच काही खाललं तर आवाजात फरक पडेल किंवा काही तरी होईल या भीतीने मी काहीच खाल्लं नाही. या सगळ्या गडबडीत मला १७ तास उपाशी रहावं लागलं. तस पाहायला गेलं तर त्यावेळी मला तहान-भूक या कशाचंच भान राहिलं नव्हतं”.

दरम्यान, ‘जुम्मा-चुम्मा’ या गाण्याचं रेकॉर्डिंग वांद्र्यातील महबूब स्टुडिओमध्ये झालं. याच स्टुडिओमध्ये बिग बी त्यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. त्यामुळे ब्रेक मिळाल्यावर ते गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी येत.’ जुम्मा- चुम्मा’ या गाण्याला आज जवळपास ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असेल. मात्र, या गाण्याची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.