सुनील दत्त उर्फ बलराज दत्त यांचा ६ जून १९२९ रोजी त्यावेळी पाकिस्तानात असलेल्या पंजाबच्या झेलम जिल्ह्यातील खुर्दी गावात जन्म झाला. सुनील दत्त यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. ते १८ वर्षांचे असताना भारत- पाकिस्तान फाळणीच्या काळात भारतात आले. आपल्या कुटुंबीयांसोबत ते हरियाणाच्या यमुना नगर इथल्या मंडोली गावात स्थायिक झाले. लखनऊमधून त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाच ते आरजेची नोकरीसुद्धा करत होते. त्याचवेळी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. १९५५ मध्ये ते मुंबईत आले. सुनील दत्त मुंबईत आले तेव्हा बलराज साहनी बॉलिवूडमध्ये एक आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जात होते. एकाच नावाचे दोन हिरो इंडस्ट्रीत चालणार नाही, असा समज असल्याने बलराज हे नाव बदलून सुनील दत्त झाले.

बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी सुनील दत्त यांना खूप संघर्ष करावा लागला. सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली पण अपेक्षित यश त्यांना मिळालं नाही. १९५७ मध्ये ‘मदर इंडिया’ने त्यांना खरी ओळख दिली. याच चित्रपटादरम्यान अभिनेत्री नर्गिसच्या प्रेमात ते पडले.

सिलोन या प्रसिद्ध रेडिओ वाहिनीवर आरजे म्हणून काम करत असताना नर्गिस यांची मुलाखत घेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र संधी मिळाल्यानंतर ते नर्गिससमोर एक शब्दही बोलू शकले नाहीत. त्यामुळे ती मुलाखत रद्द करण्यात आली. पुढे १९५७ साली सुनील दत्त यांना ‘मदर इंडिया’ या सिनेमात नर्गिसबरोबरच काम करण्याची संधी मिळाली. ‘मदर इंडिया’च्या सेटवर अचानक आग लागली असता, सुनील दत्त यांनी जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचा जीव वाचवला. या घटनेनंतर नर्गिस व सुनील एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. पुढे त्यांनी लग्नही केलं.

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. यामध्ये त्यांनी संजय दत्तच्या वडिलांची भूमिका साकारली होती.