11 December 2017

News Flash

‘देव असल्यासारखे वागू नकोस’; सुनील कपिलचा शो सोडणार?

'हा सर्वस्वी तुझा शो असल्याची जाणीव करुन देण्यासाठी धन्यवाद'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 11:08 AM

कपिल शर्मा, सुनिल ग्रोवर

विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाहून परतताना विमानप्रवासादरम्यान झालेल्या वादानंतर कपिल शर्माने एका एफबी पोस्टद्वारे हे सर्व प्रकरण कौटुंबिक असल्याचे म्हणत त्याची भूमिका स्पष्ट केली होती. पण, सुनीलने मात्र या सर्व प्रकरणी मौन बाळगले होते. पण, मंगळवारी सकाळी ट्विटरद्वारे एक पोस्ट करत सुनीलनेही झाल्याप्रकरणी आपण दुखावलो गेल्याचे सांगत त्याची प्रतिक्रिया दिली.

‘प्राणीमात्रांसोबतच माणसांचाही आदर करायला शिका. तुझ्या इतकं यश कोणाच्याही वाट्याला येणं शक्य नाही. तुझ्या इतकं कौशल्यही कोणामध्ये नसेल. पण, जर तुझ्यासोबत काम करत असलेल्या व्यक्तींमध्ये तुझ्या इतके कौशल्य असते, तर कोणालाही तुझी किंमतच कळली नसती. त्यामुळे त्यांचाही आदर करायला शिक. कारण अशाच मंडळींमुळे तुला हे यश मिळालं आहे.’ असे सुनीलने लिहिले आहे. त्यासोबतच त्याने कपिलला उद्देशून असेही लिहिले आहे की, ‘हा सर्वस्वी तुझा शो असल्याची जाणीव करुन देण्यासाठी धन्यवाद. या कार्यक्रमातून कोणालाही कधीही काढून टाकण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे हेच तू दाखवून दिलेस.’ सुनीलच्या या ट्विटमुळे तो आता कपिलच्या शोमध्ये परतण्याच्या आशा फारच कमी झाल्या आहेत, असे दिसते.

याआधी कपिलने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे सुनील ग्रोवरची माफी मागणारे एक ट्विट केले होते. त्यामुळे विमान प्रवासादरम्यान सुरु झालेल्या या वादाच्या ठिणगीचे आता आगीत रुपांतर होताना दिसते आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर ट्विटरद्वारे एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे दिसत असून, त्या दोघांची एकत्र येण्याची शक्यता फार कमी असल्याचेही म्हटले जात आहे. जर का सुनील ग्रोवरने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये काम करण्यास स्पष्टपणे नकार दिला तर मात्र कपिलच्या शोवर पुन्हा एकदा टांगती तलवार येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. कपिलच्या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहता अर्धाअधिक प्रेक्षकवर्ग हा फक्त आणि फक्त सुनील ग्रोवर साकारत असलेल्या अतरंगी पात्रांमुळेच कार्यक्रमाकडे खेचला जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विमानात कोणतेही भान आणि कशीचीही तमा न बाळगता सहकलाकाराचा अनादर करणं कपिलच्या चांगलच अंगाशी येताना दिसत आहे.

First Published on March 21, 2017 11:08 am

Web Title: sunil grover on kapil sharmas misbehaviour has sunil left kapil sharma show