विनोदी भूमिका आणि व्यक्तिरेखांसाठी ओळखला जाणारा अभिनेता सुनील ग्रोवर बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘तांडव’मधून एका नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सुनीलने ‘तांडव’मधील भूमिकेवर वक्तव्य केले आहे.

“तांडवमध्ये मी साडी नेसून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करणार नाही. या शोबद्दल प्रथम ऐकले तेव्हा ही जुनीपुराणी राजकीय कथा असेल, त्यात काहीच वेगळेपणा किंवा नवेपणा नसेल, असे मला वाटले होते. मात्र, मी जेव्हा पहिल्यांदा कथानक वाचले, तेव्हा माझा अंदाज चुकीचा होता हे लक्षात आले. तांडवचे कथानक एवढे पकड घेणारे आहे की मी यात गुंतत गेलो, संपूर्ण कथानक वाचून पूर्ण होईपर्यंत मी ते खाली ठेवू शकलो नाही. त्यामुळे मी हरखून गेलो” असे सुनील म्हणाला.

आणखी वाचा : आता होणार ‘तांडव’, सैफच्या आगामी सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

तो पुढे म्हणाला, “मला वाटते मी कुठेतरी एका एकसुरी चक्रात अडकलो होतो. मजेशीर किंवा विनोदी भूमिकांच्या पलीकडील कशासाठी माझा विचारच केला जात नव्हता. अली अब्बास जफर माझी निवड एका गंभीर आणि उत्कट व्यक्तिरेखेसाठी करतील असा विचारही मी कधी केला नव्हता. गुरूपालच्या व्यक्तिरेखेसाठी मी अलीची पहिली पसंती होतो हे त्याने मला सांगितल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी या व्यक्तिरेखेला न्याय देईन यावर त्याचा पूर्ण विश्वास होता.”

‘तांडव’या सीरिजच्या माध्यामातून अली अब्बास जफर यांच्या सोबतच डिंपल कपाडिया डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहेत. तसेच या सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान, झीशान अय्यूब आणि सुनील ग्रोव्हर एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. ‘तांडव’ ही वेब सीरिज १५ जानेवारी २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.