बऱ्याच वादानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याचं चरित्रात्मक पुस्तक मागे घेतलं. मात्र यानंतरही वाद मिटले नाहीत असंच चिन्ह सध्या समोर येत आहे. नवाजची पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि अभिनेत्री सुनीता राजवारने आता त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘अॅन ऑर्डीनरी लाइफ’ या चरित्रात त्याने सुनीतासोबतच्या रिलेशनशिपबद्दल काही वादग्रस्त गोष्टी लिहिल्याचा आरोप तिने केला आहे.

सुनीता पूर्वाश्रमीची प्रेयसी असल्याचं नवाजने चरित्रात स्पष्ट केलं. मुंबईत आल्यानंतर कशाप्रकारे तो सुनीताच्या प्रेमात पडला आणि एके दिवशी तिने त्याची साथ सोडली, हे सर्व त्यात मांडलं. तर सुनीताने नवाजवर खोटं बोलल्याचा आरोप फेसबुक पोस्टमध्ये केला होता. हे चरित्र लिहिण्यात नवाजची मदत करणाऱ्या पत्रकार रितुपर्णा चॅटर्जी आणि प्रकाशकांना तिने नोटीस पाठवली आहे. पुस्तकात सुनीताविषयी लिहिलेल्या गोष्टींमुळे कुटुंबियांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागत असल्याचंही तिने या नोटीशीमध्ये म्हटलं.

PHOTO : ‘झलकारी बाई’चा फर्स्ट लूक होतोय व्हायरल

नवाजुद्दीनच्या पुस्तकामुळे आपल्याला मानसिक त्रास झाला असून प्रतिमा मलिन करण्याचा त्याने प्रयत्न केल्याचा आरोप सुनीताने केला आहे. ‘पुस्तक जरी मागे घेतलं असलं तरी त्यांचा खप अजूनही सुरूच आहे. पुस्तकांचा खप थांबवला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याने नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत माफी मागावी आणि २ कोटी रुपयांची भरपाई द्यावी,’ असं तिने म्हटलंय. आता नवाज सुनीताच्या नोटीशीला काय उत्तर देतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.