‘सुपर ३०’ प्रदर्शित झाल्यापासून सगळीकडे या चित्रपटाचीच चर्चा आहे. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. कोणताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद कुमार यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये हृतिकने आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाला समीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हृतिक (आनंद कुमार) बिहारमधील एका छोट्या गावातील गरीब कुटुंबामधील अतिशय हुशार मुलगा असतो. त्याचे कॅम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. परंतु हालाखीच्या परिस्थितीमुळे त्याला प्रवेश घेणे शक्य होत नाही. दरम्यान हृतिकच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि संपूर्ण घराची जवाबादी हृतिकच्या खांद्यावर पडते. हा संघर्ष अनुभवण्यासारखा आहे.

आनंद कुमार यांच्या आईने हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. हृतिकने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे असं आनंद कुमार म्हणाले होते. त्यांच्या आईचंही हेच म्हणणं आहे. चित्रपटात एक प्रसंग आहे जिथे आनंद कुमार यांना गोळी लागते. हा प्रसंग पाहून आनंद कुमार यांची आई रडू लागली. मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी स्वतःला सावरले.

‘सुपर ३०’ या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्सच्या अंतर्गत करण्यात आली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे.