रेश्मा राईकवार

सूरज पे मंगल भारी आठ महिन्यांनंतर चित्रपटगृहाची दारे उघडल्यानंतर एखादा निखळ मनोरंजक चित्रपट लोकांना पाहायला मिळावा, अशी प्रेक्षकांची किमान अपेक्षा पूर्ण करणारा चित्रपट म्हणून ‘सूरज पे मंगल भारी’चा उल्लेख करता येईल. मात्र विनोदी कथा आणि मनोज वाजपेयी, दिलजीत दोसैनसारखे हुकमी कलाकार असूनही हा चित्रपट लय भारी आहे, अशी अवस्था होत नाही. मोठे कलाकार आणि तद्दन मसाला चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची मांडणी वेगळी आहे. कथेतील कच्चे दुवे सांधता आले असते तर मनोरंजनातही हा चित्रपट भारी ठरला असता!

‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटाची कथा १९९५ सालच्या ‘बॉम्बे’त घडते. कथेचा आशय पाहता त्यासाठी याच काळाची गरज का, हा प्रश्न पडतो आणि जर ही गोष्ट आत्ताच्या काळाला अजिबातच अनुसरून नसेल तर ती आताच दाखवण्यात दिग्दर्शकाने नेमके  काय साधले? या दोन प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. एक मराठी कु टुंब आणि एक उत्तरप्रदेशी कु टुंब यात घडणारी ही कथा आहे. मुलींची पत्रिका बघण्यापेक्षा वरवर चांगल्या, सुसंस्कृत घरातील वाटणाऱ्या मुलांचे नेमके  वागणे, त्यांचा स्वभाव जाणून घ्या, असा आग्रह धरणारा मधु मंगल राणे (मनोज वाजपेयी) हा गुप्तहेर म्हणजे सगळ्या लग्नाळू तरुणांच्या राशीतला मंगळ ठरला आहे. हाच मंगळ स्वभावाने खरोखरच साधाभोळा असणाऱ्या सूरजलाही विनाकारण नडतो आणि त्यातून पुढे एकमेकांवर भारी पडण्याचा हा सिलसिला सुरू होतो, असे हे कथानक आहे. दिग्दर्शक अभिषेक शर्माचीच कथाकल्पना असलेल्या या चित्रपटाचे पटकथालेखन रोहन शंकर आणि शोखी बॅनर्जी यांनी के ले आहे. हा उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो, कारण कथेत जे १९९५ चा काळ लक्षात घेत ज्या सामाजिक-राजकीय गोष्टींचे संदर्भ येतात त्यावर पटकथा लिहिताना फारसे काम के ल्याचे जाणवत नाही. उदाहरणच द्यायचे तर ‘बॉम्बे’ या नावाचा जाणीवपूर्वक के लेला उल्लेख, त्याच अनुषंगाने मुंबईतला मराठी माणूस आणि बाहेरून येऊन इथे स्थायिक झालेल्यांचा संघर्ष हा भाग फक्त वरवर दिसतो. प्रत्यक्षात मधु राणे आणि मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला सूरज सिंग धिल्लाँ (दिलजीत दोसैन) यांच्यातला वाद हा वर सांगितल्याप्रमाणे मधुच्या हेरगिरीमुळे सुरू होतो आणि त्याच्यामुळेच रंगतो. नाही म्हणायला मधुची बहीण तुळशी राणे (फातिमा सना शेख) ही आणखी एक महत्त्वाची व्यक्ति रेखा यात आहे. दिवसभर आई आणि भावाच्या शब्दाबाहेर नसलेली साधी सुंदर, सुशील तुळशी आणि रात्री डीजे म्हणून क्लबमध्ये आपली एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी जिगरबाज तुळशी अशा दोन रूपांत ती वावरते. तुळशीमुळे मधु आणि सूरज यांच्यातला वाद अधिक रंगतदार झाला असला तरी शेवटी नायक-नायिका आणि तिचा खलनायकी भाऊ अशा ठरावीक पद्धतीनेच ही कथा पुढे जाते.

त्या काळच्या मुंबईचे चित्रण करणे ही अवघड गोष्ट होती, मात्र ते भान कसोशीने जपण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने के ला आहे. निखळ, विनोदी पद्धतीने कथेची मांडणी असल्याने चित्रपट आपले रंजनही करतो. मधुच्या व्यक्तिरेखेला त्याच्या भूतकाळात घडलेल्या घटनेचा दिलेला संदर्भ हा फारच ओढूनताणून जोडलेला आहे. त्याचा हट्टी, हेके खोर स्वभावाचाच धागा आणखी घट्ट करता आला असता. त्या तुलनेत सूरज आणि तुळशी या दोन्ही व्यक्तिरेखांबरोबरच संपूर्ण कथेवर मधुची गोष्ट भारी पडली आहे. मनोज वाजपेयीला विनोदी भूमिके त पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे; पण त्यातही त्याच्या व्यक्तिरेखेला विक्षिप्तपणा जोडला असल्याने विनोदाची मात्रा सहजच कमी होते. दिलजीत दोसैनने नेहमीप्रमाणे आपल्या सहज अभिनयावर हा सूरज तारून नेला आहे. फातिमा सना शेख मराठमोळ्या तुळशीच्या भूमिके त सुंदर दिसली आहे. मात्र सुप्रिया पिळगावकर, अन्नू कपूर अशी चांगली मंडळी असताना त्यांना फारसा वावच दिग्दर्शकाने दिलेला नाही. चित्रपटाची गाणीही श्रवणीय नाहीत, त्यामुळे त्यांचाही चित्रपटाला काही उपयोग झालेला नाही. सध्याच्या परिस्थितीत त्यातल्या त्यात एखादा विनोदी चित्रपट असावा ही किमान गरज ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पूर्ण करतो.