सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या रिया चक्रवर्तीने ८ जून रोजी सुशांतचं घर सोडलं होतं. घर सोडल्यानंतर रियाने निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांना मेसेज केला होता. इंडिया टुडेने रिया आणि महेश भट्ट यांच्यात नेमकं काय बोलणं झालं होतं याचा खुलासा केला आहे. रियाने घर सोडल्यानंतर लगेचच महेश भट्ट यांना मेसेज करुन म्हटलं होतं की, “जड अंतकरणाने आणि सुटकेचा निश्वास टाकत आयेशा पुढची वाटचाल करत आहे”. आयेशा हे रियाचं ‘जलेबी’ चित्रपटातील पात्राचं नाव आहे. महेश भट्ट या चित्रपटाचे निर्माता होते.

या मेसेजमध्ये तिने पुढे म्हटंल आहे की, “आपला शेवटचा फोन मला जाग देणारा होता. तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहात. तेव्हाही आणि आत्ताही”. सूत्रांनुसार, महेश भट्ट यांनी रियाच्या मेसेजला उत्तर दिलं होतं की, “मागे वळून पाहू नकोस. जे अशक्य आहे ते शक्य कर. तुझे वडील आता आनंदी असतील”.

सुशांत आणि बहिणीमधील वादात रिया करत होती मध्यस्थीचा प्रयत्न; सुशांतचे मेसेज आले समोर

रियाने त्यावर म्हटलं होतं की, “तुम्ही त्यादिवशी फोनवर मला माझ्या वडिलांबद्दल जे सांगितलंत त्यामुळे मला बळ मिळालं. त्यांनी तुमचे आभार मानले आहेत. माझ्यासाठी एक विशेष व्यक्ती राहिल्याबद्दल तुमचे आभार”.

पुढे भट्ट यांनी यावर म्हटलं की, “तू माझ्या मुलीसारखी आहेस. मला आता हलकं वाटतंय”. यावर रिया म्हणते, “माझ्याकडे शब्द नाहीत”. महेश भट्ट त्यानंतर रियाला असंच खंबीर राहा सांगत आभार मानत आहेत.

रियाने पोलीस आणि इतर चौकशींमध्ये सुशांतने आपल्याला घर सोडण्यास सांगितलं होतं अशी माहिती दिली आहे. पण हे मेसेज पाहता रियाचे वडील सुशांतसोबत राहण्यावरुन नाराज होते असं समोर येत असून महेश भट्ट यांनीही तिला वडिलांचं ऐकण्याचं सल्ला दिल्याचं समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने इतरांशी बोलताना सुशांतचा आजार आणि आपल्याला होत असलेल्या त्रासाचा उल्लेख केला होता. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयच्या हाती गेला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाने दिलेल्या मानसिक त्रासामुळेच सुशांतने आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. तसंच सुशांतची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप आहे.