बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिस चौकशी करत आहेत. सुशांतचे वडिल के. के. सिंह यांनी अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली आहे. रिया चक्रवर्ती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने सुशांतच्या घरातले महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे.

‘दुर्दैवाने सुशांतचे कुटुंबीय केवळ पैशांच्या गोष्टीवर लक्ष देत आहेत आणि इतर पोस्ट व मुलाखतींकडे दुर्लक्ष करीत आहेत. ज्यामध्ये सुशांतला घराणेशाहीला समोरे जावे लागले असल्याचे म्हटले होते’ असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर कंगनाने आणखी दोन ट्विट केले आहेत. ‘सुशांतवर निशाणा साधणे सोपे असल्यामुळे त्यांनी असे केले. त्यांनी रणबीर कपूर किंवा वरुण धवन यांच्यासोबत असे का केले नाही?’ या आशयाचे ट्विट करत तिने संताप व्यक्त केला आहे.

सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना रणौतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने सुशांतचा बळी हा इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे गेला असा आरोप केला होते.

काय म्हणाली आहे कंगना ?
“सुशांतसिंग राजपूतच्या हत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी मी वाचल्या तर काही मी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. बॉलिवूडमध्ये त्याच्यासोबत जे काही घडत होते त्यामुळे तो त्रस्त झाला होता असे सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले. अभिषेक कपूर या दिग्दर्शकासोबत सुशांतने केदारनाथ नावाचा सिनेमा केला होता. त्यांनी असे म्हटले आहे की सुशांतचे मानसिक आरोग्य हळूहळू बिघडवण्यात आले. तर अंकिता लोखंडे जिने सुशांतसोबत दीर्घकाळ काम केले तिने सुशांत सामाजिक स्तरावर त्याचा झालेला अपमान आणि बदनामी सहन करु शकला नाही असे म्हटले आहे. बॉलिवूडच्या मू्व्ही माफियांनी अत्यंत पद्धतशीरपणे सुशांतची बदनामी केली. त्याचे नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरु केले. ज्यामुळे हळूहळू सुशांत नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला. अनेक सो कॉल्ड पत्रकारांनी त्याच्याबद्दलच्या खोट्या बातम्याही पसरवल्या.” असे म्हणत कंगनाने काही वृत्तपत्रांच्या नावांचाही उल्लेख केला होता.