अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी गुरुवारी वांद्रे पोलिसांनी तब्बल ११ तास रिया चक्रवर्तीची चौकशी केली व तिची जबानी नोंदवून घेतली. रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतची जवळची मैत्रीण होती.

“सुशांतने कधीही त्याच्या समस्या इतर कोणाला सांगितल्या नाहीत. तो नैराश्यामध्ये असल्याचे निदान झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याने डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेणेही बंद केले होते. काही वेळा सुशांत स्वत:ला खोलीमध्ये बंद करुन घ्यायचा व तासनतास रडत बसायचा” असे रियाने पोलिसांना सांगितले. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

सुशांत बरोबर तिची ओळख कधी झाली? तसेच त्यांच्या नात्याबद्दलही तिने पोलिसांना सांगितले. रियाच्या स्टेटमेंटनुसार २०१३ साली सुशांत शुद्ध देसी रोमान्स चित्रपटासाठी शूटिंग करत असताना आपली त्याच्याबरोबर ओळख झाली. त्यावेळी ‘रिया ‘मेरे डॅडी की मारुती’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होती.

“शूटिंग सुरु असलेल्या दोन्ही चित्रपटांचे सेट जवळ होते. तिथे माझी सुशांत बरोबर पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर अनेक पाटर्यांमध्ये आम्ही भेटलो व आमच्या मैत्रीचे नाते तयार झाले” असे रियाने पोलिसांना सांगितले.

“सुशांत मानसिक समस्यांचा सामना करत होता. पण त्याबद्दल तो कोणाशीही बोलला नाही. तो एकटाच रहायचा. अनेकदा तो त्याच्या पुण्यातील फार्महाऊसवर निघून जायचा. नैराश्यामध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला व उपचाराचा भाग म्हणून गोळया घेण्यास सुरुवात केली. पण मागच्या काही दिवसांपासून त्याने गोळया घेणे बंद केले होते” असे रियाने पोलीस चौकशीत सांगितले.

“सुशांतला एकटयाला वेळ हवा होता. म्हणून त्याच्या सांगण्याप्रमाणे मी सहा जून रोजी निघून गेले. त्याची अवस्था बघून, त्याने मला जे सांगितलं ते मी ऐकलं. सुशांत स्वत:बद्दल विचार करेल व लवकरच सर्व काही सुरळीत होईल असं मला वाटलं. पण त्यानंतर १४ जून रोजी मला सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी समजली” असं रियाने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटलं आहे.