अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याच्याकडे केंद्रीय अन्वेषण विभागाने सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली. याशिवाय सीबीआयच्या विशेष पथकाने मुंबईच्या अंधेरी परिसरातील एका रिसॉर्टवर जाऊनही तपास के ला.

गेल्या वर्षी दोन महिने सुशांतचे या रिसॉर्टवर वास्तव्य होते. उपचारांच्या नावाखाली अभिनेत्री रिया चक्र वर्ती आणि तिच्या कुटुंबाने सुशांतला एका रिसॉर्टवर ठेवले होते, असा आरोप त्याचे वडील के. के. सिंह यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. सीबीआय पथकाने रिसॉर्टचा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. शिवाय सुशांतचा मित्र सिद्धार्थ याला पथकाने सोमवारी पुन्हा चौकशीला बोलावले होते. सलग तिसऱ्या दिवशी सिद्धार्थकडे पथकाने बराच वेळ चौकशी केली.

१४ जूनला वांद्रे येथील निवासस्थानी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्यावेळी सिद्धार्थ, त्याचा आचारी नीरज सिंह, नोकर दीपेश सावंत घरी उपस्थित होते. सुशांत आपल्या खोलीचे दार उघडत नसल्याने सिद्धार्थने चावी बनविणाऱ्या व्यक्तीला बोलावून आणले होते. बनावट चावीने दार उघडल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत सुशांत तिघांना आढळला होता. १४ जूनच्या सकाळी सात वाजल्यापासून दुपारी सुशांत मृतावस्थेत आढळेपर्यंत घरात घडलेली प्रत्येक घटना, प्रसंग कशा पद्धतीने घडला हे सीबीआयच्या विशेष पथकाने शनिवार, रविवारी  प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जाणून घेतले. यावे दोन दिवसांत सिद्धार्थसह सुशांतचा आचारी नीरज सिंह, नोकर दिपेश सावंत हजर होते. चावी बनविणाऱ्या व्यक्तीलाही बोलावण्यात आले होते. पथकाने वांद्रे पोलीस, उपायुक्त अभिषेख त्रिमुखे यांच्याशीही दोन दिवसांत प्रदीर्घ चर्चा केली. दरम्यान, सीबीआयने अद्याप रिया किंवा तिच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही चौकशीसाठी बोलावलेले नाही, असे रियाचे वकील अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.