बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी ड्रग्स चॅट समोर येताच अंमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी)ने रिया चक्रवर्ती हिला ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली अटक केली. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार सुरु असलेल्या चौकशीमध्ये रियाने २५ बड्या कलाकारांची नावे घेतली होती. यात रकुलप्रीत सिंहचा समावेश असल्याचे वृत्तामध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर तिने दिल्ली हायकोर्टात या विरुद्ध याचिका दाखल केली आहे.

रकुलने याचिकेत आपल्याविरोधात सुरु असलेले ‘मीडिया ट्रायल’ थांबवले जावेत अशी मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. तसेच मीडियामध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टींमुळे प्रतिमा मलीन होत असल्याचाही उल्लेख केला आहे.

रकुलला चित्रीकरणादरम्यान रियाने सारा अली खान आणि तिचे नाव घेतले असल्याचे मीडियामध्ये देण्यात आलेल्या माहितीमध्ये कळाले. तसेच मीडिया रकुलला त्रास देत असल्याचे तिच्या वकिलांनी याचिकेमध्ये नमुद केले आहे.

हायकोर्टाने सर्व मीडिया चॅनेलला संयमाने काम करण्यास सांगितले आहे. तसेच कोणत्याही नियमांचे उल्लंघन करु नये असे म्हटले आहे. दरम्यान कोर्टाने केंद्र सरकार, NBA (नॅशनल ब्रॉडकास्टर असोसिएशन), प्रसार भारती, प्रेस काउंसिल यांना रकुलप्रीतच्या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी रियाला अटक करण्यात आली. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार सुरु असलेल्या चौकशीमध्ये रियाने २५ बड्या कलाकारांची नावे घेतली. यात सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचा समावेश होता.

‘फ्री प्रेस जर्नल’ला अंमली पदार्थविरोधी पथकाचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘आम्ही बॉलिवूड कलाकारांची कोणतीही यादी तयार केलेली नाही. यापूर्वी तयार केलेली यादी ड्रग्स पेडलर आणि तस्करांची होती. त्यामुळे ती बाॉलिवूडची असल्याचा गोंधळ झाला.’