अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पाटणा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच सुशांतला धमक्या दिल्याचंही म्हटलं आहे. त्यानंतर आता अटकपूर्व जामिनासाठी रियाने प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय. रियाने मंगळवारी रात्री वकिलांची भेट घेतली असून बुधवारी ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहे. रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी जामिनासाठीची सर्व कागदपत्रे तयार केली आहेत.

सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते. “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”, असे आरोप सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत केले आहेत.

आणखी वाचा : ‘जर सत्याची किंमत नसेल..’; सुशांतच्या बहिणीने केली न्यायाची मागणी 

“सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती,” असंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.