अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर १२ दिवसांनी त्याच्या वडिलांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी सुशांतच्या बऱ्याच आठवणीसुद्धा सांगितल्या. सुशांतच्या जन्मासाठी नवस केल्याचीही गोष्ट त्यांनी सांगितली. “माझ्या मुलाने केवळ ३४ वर्षांत जे कमावलं, जेवढं यश संपादन केलं, ते करायला अनेकांना आयुष्यही पुरत नाही. तो खूप खास मुलगा होता”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

सुशांतने चंद्रावर जमीन विकत घेतली होती. भौतिकशास्त्राची त्याला प्रचंड आवड होती. ५५ लाख रुपयांची दुर्बिण त्याने विकत घेतली होती आणि याच दुर्बिणीतून तो चंद्रावर विकत घेतलेली जमीन पाहायचा, असं त्याचे वडील म्हणाले. त्याच्याविषयी अभिमानाने सांगताना ते पुढे म्हणाले, “आसाम आणि केरळच्या सरकारला त्याने कोट्यवधी रुपये दान केले. गरीब, होतकरू मुलांची मदत करण्यासाठी तो तत्पर असायचा. त्याने अनेक मुलांना नासामध्ये पाठवलं आहे.”

आणखी वाचा : कोणीच पाठिंबा देत नाही म्हणून करण जोहरने घेतला ‘हा’ निर्णय

सुशांतने इंजिनीअरिंगचं शिक्षण सोडून मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आला होता. कोणताही गॉडफादर नसताना त्याने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बॅकग्राऊंड डान्सर, मालिका आणि चित्रपट असा त्याचा प्रवास अनेकांना हेवा वाटेल असा आहे. त्यामुळे त्याच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.