बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत कलाकारांची लक्झरी लाइफस्टाइल, स्टारडम,उच्चभ्रूपणा ही जशी एक बाजू आहे. तशीच त्यांच्या जीवनाची आणखी एक बाजू गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याने नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती नाही. परंतु, यश, पैसा सारं काही हाताशी असताना अचानक त्याच्या मृत्युमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्याप्रमाणेच या लॉकडाउनच्या काळात काही कलाकारांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं.

१. दिशा सालिया-
सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी दिशा सालिया हिने आत्महत्या केली. दिशा सालिया ही सुशांत सिंहची माजी मॅनेजर होती. दिशाने १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन तिचं जीवन संपवलं. तिच्या निधनाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहे. तसंच तिच्या निधनावेळी तिचा जवळचा मित्र तिच्यासोबत उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे.

२. प्रेक्षा मेहता –
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली. २५ वर्षीय प्रेक्षाने इंदौर येथील घरी आत्महत्या केली. प्रेक्षाने ‘क्राइम पेट्रोल’, ‘मेरी दुर्गा’, ‘लाल इश्क’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. आत्महत्येपूर्वी प्रेक्षाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ‘स्वप्न तुटणं हे सगळ्यात मोठं दु:ख असतं’, असं प्रेक्षाने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

३. मनमीत ग्रेवाल-
३२ वर्षीय अभिनेता मनमीत ग्रेवाल याने आर्थिक संकट कोसळल्यामुळे आत्महत्या केली. गेल्या कित्येक महिन्यांपासून मनमीत आर्थिक संकटात होता. याच नैराश्याच्या भरात त्याने जीवन संपवलं. त्याने ‘आदत से मजबूर’, ‘कुलदीपक’ या मालिकांमध्ये काम केलं होतं.