‘काइ पो चे’, ‘केदारनाथ’ यांसारख्या चित्रपटांसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत काम केलेला दिग्दर्शक अभिषेक कपूर याने एक नवा खुलासा केला आहे. “‘केदारनाथ’ चित्रपटाच्या वेळी अभिनेत्री सारा अली खानकडेच सर्वांच लक्ष वेधलं होतं, कारण तिचा तो पहिला चित्रपट होता. माध्यमांनीही सुशांतकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे तो फार अस्वस्थ होता”, असं तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला.

“केदारनाथचं शूटिंग सुरू असताना सुशांत फार अस्वस्थ होता. पण त्याचं काम तो १०० टक्के मन लावून करत होता. त्याने कधीच सेटवर कसले नखरे केले नाहीत. शूटिंगसाठी साराला त्याला पाठीवर उचलून घ्यावं लागत होतं पण तरीही त्याने रिटेक द्यायला कधीच नकार दिला नाही. साराचा पहिलाच चित्रपट असल्याने संपूर्ण माध्यमांचं लक्ष तिच्याकडेच होतं. यामुळे तो फार अस्वस्थ होता”, असं अभिषेक कपूर म्हणाला.

आणखी वाचा : अक्षयला फोटोशूट करताना वॉचमनने दिलं होतं हाकलून; त्याच ठिकाणी घेतलं स्वत:चं घर

चित्रपटानंतर अभिषेकने अनेकदा सुशांतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुशांतने कधीच त्याला उत्तर दिलं नसल्याचं त्याने पुढे सांगितलं. “त्याने जवळपास ५० वेळा तरी त्याचा फोन नंबर बदलला असेल. केदारनाथ प्रदर्शित झाल्यावर सुशांतला माध्यमांचं लक्षच मिळालं नाही. सर्वकाही साराबाबत सुरु होतं. त्याला आपण कुठेतरी हरवल्यासारखं वाटलं असावं. चित्रपटाच्या यशानंतर मी त्याला मेसेज केला. पण त्याने त्याला उत्तरच दिलं नाही. त्याच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला. तेव्हासुद्धा त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्यानंतर मीसुद्धा फार प्रयत्न केले नाहीत”, असं तो म्हणाला.

रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.