कलाविश्वापासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते. बऱ्याच वेळा ती इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ९ डिसेंबरला सुष्मिताने इन्स्टाग्रामवरुन एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. तिच्या या खुलाशामुळे चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल यात शंका नाही. सुष्मिता तब्बल १० वर्षानंतर पुन्हा एकदा कलाविश्वामध्ये पदार्पण करत असल्याचं तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसोबत तिने एक व्हिडीओही शेअर केला आहे.

“मला कायम प्रेमाबद्दल आदर आहे. त्यामुळे त्याची किंमत मला माहित आहे. चाहत्यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. या प्रेमामुळेच मी माझ्या चाहत्यांची फॅन झाले. माझ्या चाहत्यांनी १० वर्ष माझी प्रतीक्षा केली. प्रत्येक पावलावर त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला, मला काम करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच मी केवळ तुमच्यासाठी परत येते”,असं सुष्मिताने पोस्ट शेअर करत म्हटलं.


दरम्यान, दहा वर्षांनंतर सुष्मिता बॉलिवूडमध्ये परत येण्याचा विचार करत आहे. २०१० मध्ये ती ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटात दिसली होती. संजय दत्त, अक्षय खन्ना, परेश रावल, कंगना , नितू चंद्रा, सुनिल शेट्टी अशी तगडी स्टारकास्ट असतानादेखील हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबदस्त आदळला होता. त्यानंतर १० वर्षे सुष्मिता चित्रपटात दिसली नव्हती. त्यामुळे तिच्या कमबॅकबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.