२५ वर्षांपूर्वी अभिनेत्री सुश्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’ हा’किताब जिंकून इतिहास रचला होता. हा किताब जिंकणारी सुश्मिता ही पहिली भारतीय महिला होती.या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने सुश्मिताच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा एकदा मुकुट घालून हा खास दिवस साजरा केला.सुश्मिताचा बॉयफ्रेंड आणि तिच्या मुलींनी तिच्यासाठी खास सरप्राइजचे आयोजन केले होते.

सुश्मिताने सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये सुश्मिता केक कापताना दिसतेय तर दुसऱ्या फोटोमध्ये सुश्मिता तिच्या मुलींसोबत आनंदाने सेल्फी काढताना दिसतेय. या फोटोंबरोबरच तिने इंस्टाग्रामवर तिच्या मिस युनिव्हर्सच्या प्रवासाबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते की, “हा प्रवास खूप छान होता. माझ्या मातृभूमीचे मी खूप आभार मानते की तिने मला ‘भारतीय’ अशी ओळख दिली.गेल्या २५ वर्षात मला मिळालेलं प्रेम,आदर या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.माझे दुसरे घर असलेल्या फिलिपिन्समधील लोकांचेही मी खूप आभार मानते. १९९४ साली या स्पर्धेत भाग घेणाऱ्या माझ्या ७७ स्पर्धक मैत्रीणींचेही मी आभार मानते.मी देवाचे,मित्रमैत्रिणींचे आणि माझ्या गुरुंचेही खूप आभार मानते, त्यांनी मला नेहमीच काम करण्याची प्रेरणा दिली.”

या पोस्टमध्ये सुश्मिताने तिच्या मुलींचेही कौतुक केले आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये सुश्मिताने असं लिहिलं आहे की,”मी नुकतीच दुबईहून आले आणि काही तासातच गोव्याला जाणार होते. माझ्या कुटुंबीयांनी माझ्यासाठी केलेल्या या सेलिब्रेशनची मला काहीच कल्पना नव्हती.” १९९४ साली ‘मिस युनिव्हर्स’चा ‘किताब पटकावल्यानंतर तिने १९९६ साली आलेल्या ‘दस्तक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.