आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. सुष्मिता गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सुष्मिताच्या जुन्या व्हिडीच्या चर्चा रंगल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सुष्मिताने तिच्यासोबत १५ वर्षांच्या मुलाने गैरवर्तन केल्याचे म्हटले आहे.
सुष्मिताने मुलाखतीच्या या व्हिडीओमध्ये घडलेला प्रकार सांगितला आहे. ‘जवळपास सहा महिन्यांपूर्वीची ही घटना आहे. एका पुरस्कार सोहळ्याला मी हजेली लावली होती. तेथे पत्रकारांचा घोळका माझ्या आजूबाजूला होता. तेथे एका १५ वर्षीय मुलाने माझ्यासोबत गैरवर्तन केले. गर्दी असल्याने मी त्याला पकडू शकणार नाही असे त्याला वाटले होते. पण मी त्याचा हात पकडून त्याला पुढे खेचले. तो १५ वर्षांचा मुलगा आहे हे पाहून मला धक्काच बसला’ असे सुष्मिता म्हणाली.
View this post on Instagram
‘मी त्यावेळी कोणतीही अॅक्शन घेऊ शकत होते पण मी तसे केले नाही. त्या १५ वर्षांच्या मुलाला मी सोबत घेऊन गेले. या घटनेबद्दल जर मी कोणाला सांगितले तर तुझे आयुष्यच संपेल असे मी त्याला म्हटले. ते ऐकून त्याने यापुढे असे कधीच करणार नाही असे म्हणत माफी मागितली’ असे ती म्हणाली.
त्यानंतर सुष्मिताने स्वत:च्या सुरक्षेसाठी मुलींनी काही गोष्टी शिकायला हव्यात, ज्या अशा प्रसंगांमध्ये आपली मदत करतात असे देखील म्हटले आहे. सुष्मिताचा हा व्हिडीओ जवळपास दोन वर्षांपूर्वीचा असल्याच म्हटले जाते. पण सध्या सोशल मीडियावर जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 1:30 pm