‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’चा घना, ‘दुनियादारी’चा प्रेमळ श्रेयस अशा भूमिकांमधून अभिनेता स्वप्नील जोशी लोकांना खूप आवडतो. मराठी चित्रपटांमधला ‘चॉकलेट हिरो’ अशी त्याची प्रतिमा आजतागायत कायम आहे. आगामी ‘मितवाँ’मधूनही स्वप्नील पुन्हा एकदा दोन नायिकांमध्ये अडकलेला प्रेमळ नायक रंगवतो आहे. मात्र, प्रेमकथांची मांडणी प्रत्येक चित्रपटागणिक वेगळी असते. हिंदीतील नायक कित्येक वर्ष असेच ‘हिरो’ साकारताना आपण पाहत आलो आहोत. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या बाबतीत तोचतोचपणा आला आहे अशी ओरड करण्यात अर्थ नाही, असे स्वप्नील जोशीने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
एकाचवेळी नाटक, टीव्ही आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून सहजपणे वावरणाऱ्या स्वप्नीलने छोटय़ा पडद्याला सध्या अर्धविराम दिला आहे. त्याचा ‘मितवाँ’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने, ‘मितवाँ’ ही प्रेमकथा असली तरी प्रत्येक प्रेमकथेचा शेवट हा आणि ते सुखाने नांदू लागले असा असतो. या चित्रपटात प्रेमासाठी करावा लागणारा त्याग किती महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करण्यात आले आहे, असे स्वप्नीलने सांगितले. स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित ‘मितवाँ’ या चित्रपटात स्वप्नीलने सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्याबरोबर काम केले आहे. ‘दुनियादारी’, ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ आणि आता ‘मितवाँ’ असे लागोपाठ प्रेमपट करूनही आपल्याला एकाच प्रतिमेत अडकण्याची भीती वाटत नाही, असे तो म्हणतो. मराठीत एकाच प्रकारचे चित्रपट येत आहेत, अशी ओरड व्हायला अजून ३० वर्ष जावी लागतील. आता कुठे मराठी चित्रपटांची नवी सुरूवात झाली आहे, असे म्हणणारा स्वप्नील छोटा पडद्याला आपण अंतर देणार नाही, असे म्हणतो. माझी सुरूवातच टीव्हीमुळे झाली. त्यामुळे काहीही झाले तरी टीव्हीवर मालिका, शो करणे सोडणार नाही, असे त्याने सांगितले. ‘मितवाँ’ नंतर अमृता खानविलकरबरोबर ‘वेलकम जिंदगी’ हा त्याचा आगामी चित्रपट यावर्षी प्रदर्शित होईल.