देशात करोनाचा कहर वाढत चालला आहे. देशातल्या करोना रुग्णांची संख्या कमी व्हायचं नावच घेत नाही. अनेक सेलिब्रिटी आणि त्यांच्या परिवारातल्या सदस्यांनाही करोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री स्वरा भास्करच्या आईलाही करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे.

स्वराची आई इरा भास्कर यांना करोनाची लागण झाली आहे. स्वराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “तो आता घरात आलाय. माझी आई आणि माझा स्वयंपाकी दोघेही करोनाबाधित आढळले आहेत. आम्ही स्वतःला आमच्या दिल्लीमधल्या घरात विलग करुन घेतलं आहे.” यासोबतच स्वराने आपल्या चाहत्यांना मास्क घालण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहनही केले आहे.

स्वरा आपला आगामी चित्रपट ‘जहा चार यार’ यासाठी गोव्यामध्ये चित्रीकरण करत होती. तिची सहकलाकार मेहेर विजला करोनाची लागण झाल्याने चित्रीकरण अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आलं होतं.

तिने याबद्दल आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना माहिती दिली होती. जहा चार यार या चित्रपटाचे निर्माते विनोद बच्चन यांनी इतर सर्व टीमचा करोना अहवाल निगेटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. तसंच करोनाचा धोका लक्षात घेऊन चित्रीकऱण थांबवल्याचंही त्यांनी सांगितलं.

दिल्लीतली करोनाची स्थिती लक्षात घेऊन आजच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिथे आठवड्याभराचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज रात्री १० वाजल्यापासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे.