बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करची ‘रसभरी’ ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे. ही वेब सीरिज प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच सीरिजमधील एका दृश्यावर प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. आता स्वरा भास्करने ट्विट करत त्यांना उत्तर दिले आहे. पण तिने दिलेल्या उत्तरानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

‘दु:ख होतंय. रसभरी या वेब सीरिजमध्ये एक छोटी मुलगी पुरुषांसमोर उत्तेजक डान्स करताना एका वस्तूसारखं दाखवणं अत्यंत निंदनीय आहे. दिग्दर्शक आणि प्रेक्षकांनी आज याचा विचार करावा की ही गोष्ट मनोरंजनाची नाही तर लहान मुलांच्या प्रती असलेल्या दृष्टीकोनाचा हा प्रश्न आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की शोषणाची मनमानी?’ असे प्रसून यांनी म्हटले होते. त्यावर स्वरा भास्करने ट्विट करत प्रसून यांनी चुकीच्या अर्थाने घेतल्याचे म्हटले आहे. तसेच तिने पुढे सीनबाबत वक्तव्य केले आहे.

स्वराने हे ट्विट करताच तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. एका नेटकऱ्याने तुम्ही स्वराकडून काय अपेक्षा करता असे म्हटले आहे.

दिग्दर्शक निखल भट्ट यांच्या ‘रसभरी’ या वेब सीरिजमध्ये स्वरा भास्कर एका शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. भास्करसोबतच आयुषमान सक्सेना, सुनिक्षी ग्रोवर, मंजू शर्मा, अरुणा सोनी, अक्षय सोनी, रश्मी अगडेकर, चित्तरंजन त्रिपाठी, नीलू कोहली, प्रद्युम्न सिंह यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच या वेब सीरिजमध्ये एखाद्या विशिष्ट वयोगटातील तरुणांच्या मनात स्त्रियांविषयी येणाऱ्या विचारांवर उपहासात्मक पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे.