लोकसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा सत्ता काबिज करण्यात मोदी सरकारला यश आलं. यंदाची निवडणूक अनेक कारणांसाठी खास ठरली. लोकसभा निवडणुकीतील काही जागांवर सर्वांचंच विशेष लक्ष होतं. नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि वादग्रस्त ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करने या निवडणुकीत कन्हैय्या कुमार, आतिशी मर्लेना, दिग्वीजय सिंह आणि दिलीप पांडे यांच्यासाठी प्रचार केला. विशेष म्हणजे या चारही उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला. ‘मी ज्या उमेदवारांचा प्रचार केला, त्यांचा पराभव होणार हे मला आधीच माहीत होतं,’ असं ट्विट स्वराने केलं आहे.

‘मी ज्या उमेदवारांचा प्रचार केला, त्यांचा पराभव होणार हे मला आधीच माहीत होतं. पण हे उमेदवार लोकशाही, संविधानाचा आदर करतात, देशातील तिरस्काराविरोधात लढा देतात म्हणून मी त्यांचा प्रचार केला. काहीही झालं तरी जे सत्य आहे, त्याचं मूल्य कधीही कमी होत नाही,’ असंही स्वराने ट्विटमध्ये म्हटलं आहे. स्वराच्या या ट्विटवरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.

पुढच्या वेळेस त्या उमेदवारांना विचारून घे की प्रचारासाठी त्यांना तू हवी की नाही, अशी खिल्ली एका युजरने उडवली. तर स्वरा हारण्यासाठी प्रचार करते, असं एकाने म्हटलं.

स्वराने तिचा यंदाचा वाढदिवससुद्धा निवडणुकीसाठी प्रचार करत साजरा केला होता. बेगुसरायमधून कन्हैयाकुमार हा डाव्या पक्षांचा तरुण चेहरा बनून पुढे आला होता. तर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह हे भोपाळमधून विडणूक लढवत होते. तिसरी उमेदवार आपची आतिशी मारलेना ही माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरविरोधात लढत होती. याशिवाय आपचे आणखी एक उमेदवार राघव चड्ढा यांचाही स्वरा भास्करने प्रचार केला होता.