बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सायना’, ‘सरदार उधम सिंग’, ‘मिसाईल मॅन’ असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादीत आता आणखी एका नव्या बायोपिकपटाची भर पडली आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित आहे.

या आगामी चित्रपटाचे नाव ‘शाबाश मिथू’ असे आहे. या चित्रपटात मिताली राज हिची व्यक्तिरेखा अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे. तिने या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या पोस्टरमध्ये तापसी हुबेहूब मितालीच्या गेटअपमध्ये दिसत आहे.
“मला नेहमी विचारले जाते तुझा आवडता पुरुष क्रिकेट खेळाडू कोणता आहे. परंतु असा प्रश्न विचारणाऱ्यांनी माझी आवडती महिला क्रिकेटर कोण असा प्रश्न विचारावा अशी माझी अपेक्षा आहे. मिताली राज माझी आवडती क्रिकेट खेळाडू आहे. ती एक अल्टीमेट गेम चेंजर आहे.” अशा आशयाची कॉमेंट तापसीने ‘शाबाश मिथू’च्या पोस्टरवर लिहिली आहे.

तापसी पन्नू अत्यंत प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. यापूर्वी तिने ‘सूरमा’ या चित्रपटात एका हॉकी खेळाडूची व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या भूमिकेचे प्रेक्षक व चित्रपट समिक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. ‘शाबाश मिथू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राहूल ढोलकिया करणार आहे. सध्या या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु असून पुढल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘शाबाश मिथू’ प्रदर्शित होईल.