छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकीच गाजलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अमित भट्ट. चंपकलाल गडा उर्फ चाचाजी ही भूमिका साकारून अमित घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे अमितला अभिनयाव्यतिरिक्त इंटेरिअर डेकोरेशन करण्याचीही तितकीच आवड आहे. त्यामुळे त्याचं घर त्याने स्वत:च सजवलं आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

“मी कोणत्याही इंटेरिअर डिझायनरची मदत न घेता माझं घर सजवलं आहे. आपलं घर हे आपल्या पद्धतीने आणि आपल्या विचारांनी सजवलं पाहिजे. तसंच इंटेरिअर डिझायनर अनेकदा अवाजवी दर आकारत आणि सोबतच त्यांची काम करण्याची पद्धतीही चांगली असते. मात्र, मला माझं घर सजवायचं आहे. घर हे घरासारखचं असावं त्यामुळे मला कोणत्याही हॉटेलचं स्वरुप माझ्या घराला द्यायचं नाहीये”, असं अमित भट्ट म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “मालिकेत चंपकलाल यांची वेशभूषा साकारण्यासाठी मला बराच वेळ लागतो. मात्र, खऱ्या आयुष्यात मी असा अजिबात नाहीये. मी फार पटकन तयार होतो”.

दरम्यान, मालिकेमध्ये सतत चिडचिड करणारे चाचाजी म्हणजे अमित खऱ्या आयुष्यात अत्यंत वेगळे आहेत. पडद्यामागे सतत हसतमुख राहणाऱ्या अमितला फिरण्याची आणि गाण्यांची विशेष आवड आहे. यापूर्वी त्यांनी ‘खिचडी’ आणि ‘एफआयआर’ मालिकेतही काम केलं आहे.