करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. फेब्रुवारीमध्ये डोकं वर काढलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अवघ्या तीन महिन्यातच देशाला विध्वंसक परिस्थितीत ढकललं आहे. दररोज लाखो लोक करोनाच्या तडाख्यात सापडत असून, अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे करोना रुग्णांची मदत करताना दिसत आहेत. दरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील बापूजींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते गाण्याच्या माध्यमातून लोकांमध्ये करोनाविषयी जागरुकता निर्माण करताना दिसत आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत बापूजी हे पात्र अभिनेते अमित भट्ट यांनी साकारले आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते किशोर कुमार यांचे गाणे ‘ये जीवान है इस जीवन का’ हे गाणे गाताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला अमित यांचा हा BTS व्हिडीओ आहे.

अमित यांनी या गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या १३ वर्षांपासून अमित हे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत काम करताना दिसत आहेत. त्यांचे मालिकेतील चंपकलाल गडा हे पात्र लोकांच्या पसंतीला पडत असल्याचे दिसत आहे. आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे.