लॉकडाउनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता महाराष्ट्र सरकारने चित्रीकरणास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत. त्यानुसार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते. मालिकेत चालू पांडेची भूमिका साकारणाऱ्या दयाशंकर पांडे यांनी निर्मात्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय याबाबत सांगितले आहे.

दयाशंकर यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी, ‘आम्ही लवकरात लवकर मालिकेच चित्रीकरण सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्हाला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या नियमांनुसार सेटवर डॉक्टर असणे अनिवार्य आहे. त्यामुळे आमच्या अडचणी वाढत आहेत’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘तारक मेहत… एक असा शो आहे जेथे केवळ एक कुटुंब नाही तर संपूर्ण सोसायटीतील कुटुंबांसोबत शूट करावे लागते. ज्यामध्ये जवळपास १५ ते २० लोकं सहभागी असतात. त्यामुळे सेटवर सोशल डिस्टंसिंग पाळणे आमच्यासाठी आव्हानात्मक आहे’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार मुंबईमध्ये या महिन्यात चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. पण यामध्ये वयाने १० वर्षांपेक्षा लहान मुले आणि ६५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझेशन, सेटवर डॉक्टर असणे गरजेचे आहे.