‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिका म्हणून ओळखली जाते. गोकूळधाम सोसायटीमधील मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांचं विनोदी चित्रण या मालिकेत दाखवलं जातं. गेली १२ वर्ष ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘तारक मेहता’च्या लोकप्रियतेमागे अभिनेता दिलीप जोशी उर्फ ‘जेठालाल चंपकलाल गडा’ यांचा सिंहाचा वाटा आहे. खरं तर जेठालाल याच व्यक्तिरेखेभोवती ही मालिका खऱ्या अर्थाने फिरताना दिसते. परंतु आज एका मालिकेतून लाखो रुपयांची कमाई करणारे दिलीप जोशी कधीकाळी ५० रुपयांसाठी संघर्ष करत होते.

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

स्टँडअप कॉमेडियन सौरभ पंतला दिलेल्या मुलाखतीत दिलीप जोशी यांनी आपल्या करिअरमधील काही थक्क करणारे अनुभव सांगितले. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीवरुन केली होती. खरं तर ते एक बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायचे. ज्या दिवशी नाटक असेल त्यावशी स्टेजवरील साहित्य व्यवस्थित ठेवणे, कलाकारांच्या चहा-पाण्याची व्यवस्था करणे अशी काही काम ते करायचे. बॅकस्टेज काम करता करता त्यांना नाटकात अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यावेळी नाटकाच्या एका भागासाठी त्यांना केवळ ५० रुपये मिळायचे. ते देखील काही ठरावीक भाग झाल्यानंतर. परंतु अभिनयाची जबरदस्त आवड आणि प्रचंड महत्वाकांक्षा यांच्या जोरावर त्यांनी नाटक, मालिका आणि पुढे चित्रपट अशी मजल मारली. आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे दिलीप जोशी यांनी करिअरच्या सुरुवातीस प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना केला होता. त्यांनी आपल्या चाहत्यांना कधीही हार मानू नका अन् संधीचं सोनं करण्यासाठी तयार राहा असा सल्ला दिला आहे.