नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखली जाणारी  ‘झी टॉकीज’ वाहिनी आपल्या प्रत्येक उपक्रमाचे सादरीकरण हटके पद्धतीनेच करते. ‘टॉकीज लाईट हाऊस’ या आगामी उपक्रमासाठी अशीच हटके कल्पना ‘झी टॉकीज’ने वापरली आहे. कलाकृतीचा आस्वाद घेताना त्यामागच्या कष्टाची कल्पना आपल्याला नसते. ‘टॉकीज लाईट हाऊस’ या उपक्रमातून कलाकृतीमागचा हा प्रवास आपल्याला जाणून घेता येणार आहे.
लघुपट हे सर्जनशील अभिव्यक्ती व प्रयोगाचे माध्यम आहे. या लघुपटांना योग्य व्यासपीठच नसल्याने अनेक चांगले लघुपट रसिकांपर्यंत पोहचत नाही. हीच बाब हेरून नव्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देश्याने ‘झी टॉकीजने’ ‘टॉकीज लाईट हाऊस’ हा उपक्रम सुरु केला आहे. तरूणाईचे प्रतिनिधित्व करणारे ललित प्रभाकर आणि नेहा महाजन हा उपक्रम चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
गप्पांमधून दिग्दर्शकाचा लघुपट बनवण्यामागचा विचार तसेच दिग्दर्शकाला लघुपट करताना व तो प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आलेल्या अडचणीसुद्धा जाणून घ्यायला मिळणार आहे. लघुपटाचा विषय निवडताना त्या विषय निवडीमागचं कारण तसेच तो बनवताना आलेली आव्हानं हे जाणून घ्यायचा प्रयत्न ललित व नेहा करणार आहेत. लघुपटाच्या विषयानुरूप त्याच धर्तीच्या लोकेशनवर जाऊन या गप्पा रंगणार आहेत. यातल्या चांगल्या लघुपटकर्त्यांला लघुपट बनवण्याची संधी सुद्धा ‘झी टॉकीज’ देणार आहे.
दर रविवारी लघुपट कथेचा हा प्रवास जाणून घ्यायला मिळणार आहे. रविवार १० जानेवारी सायंकाळी ४.३० वाजता याचा पहिला भाग प्रसारित  होणार असून पुनःप्रसारणाचा आस्वाद रसिकांना दर शनिवारी सकाळी १० वाजता घेता येईल. ‘झी टॉकीज’च्या ‘टॉकीज लाईट हाऊस’ हया उपक्रमातून रसिकांना दर्जेदार लघुपटांची पर्वणीच मिळणार आहे.