चित्रपटावर प्रेम करणाऱ्या दिग्दर्शक ओम राऊतच्या चित्रपटात त्याच्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब दिसते. मनोरंजनासोबतच चित्रपट हे त्याचे व्यक्त होण्याचे माध्यम आहे, असे तो मानतो. अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला टिळकांवरील ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्यानंतर ओमने हिंदीकडे आपला मोर्चा वळवला. नुकताच ओमने दिग्दर्शित केलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा थ्रीडी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनेक कारणांनी चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी मारलेल्या गप्पा..

मी २००७ मध्ये अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान एका मित्रासोबत ग्रीक युद्धाची कथा सांगणारा हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता झॅक स्नायडरची भूमिका असलेला चित्रपट पाहिला. चित्रपटादरम्यान तो आम्हाला ग्रीक युद्धशैली, तांत्रिक गोष्टी याबद्दल अभिमानाने सांगत होता. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर भारतातही अनेक पराक्रमी योद्धय़ांनी रणांगणावर शौर्य गाजवले आहे. त्यांच्या जीवनातील संघर्षांचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडायला पाहिजे, हा विचार माझ्या मनात घोळत होता. या विचाराने प्रेरित होऊन सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या जीवनावर चित्रपट दिग्दर्शित करावा, असे ठरवल्याचे ओम सांगतो. तान्हाजींचे जीवन, सिंहगडची लढाई, याविषयी अनेक पुस्तके वाचली, इतिहास संशोधकांना भेटलो. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या वेळी आम्ही ‘तान्हाजी’च्या चित्रपटाचे काम सुरू केले होते. २०१५ पासून मी या चित्रपटाच्या कामाला लागलो. यासाठी लेखक प्रकाश कपाडिया आणि व्हीएफएक्स आर्टिस्ट प्रकाश सुतार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आणि २०१७ च्या अखेरीस अजय देवगणला मी चित्रपटाचे कथानक ऐकवले. त्यांना चित्रपटाची कथा इतकी भावली की त्यांनी अभिनय करण्यास होकार दिलाच पण याची निर्मिती करण्याचेही ठरवले, अशी माहिती ओमने दिली.

‘लोकमान्य’नंतर ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा दुसराच चित्रपटही ऐतिहासिक असल्याने पहिल्या चित्रपटाचा अनुभव गाठीशी होता. ऐतिहासिक चित्रपट करताना दिग्दर्शकाला बऱ्याच गोष्टींचे भान ठेवावे लागते. साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ रुपेरी पडद्यावर दाखवताना कलाकारांचा लूक, कपडे, गड-किल्ले कसे दिसतील याकडे बारकाईने लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. मोठय़ा पातळीवर ऐतिहासिक चित्रपट साकारताना काही गोष्टींची कल्पनाविस्ताराने मांडणी करावी लागते. चित्रपटात त्या काळातील सरदारांचे शस्त्र, पोशाख आणि स्त्रियांची आभूषणे, वस्त्रालंकार, साडय़ा आदी गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐतिहासिक चित्रपट करताना भूमिकांचे पावित्र्य जपले पाहिजे. शिवाजी महाराज, तान्हाजी मालुसरे यांचे पराक्रम महान आहेत. ते पडद्यावर तशाच पद्धतीने मांडायला हवेत असे आपले ठाम मत असल्याचे त्याने सांगितले.

आई नीना राऊत प्रख्यात निर्माती आणि वडील भारतकुमार राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे खासदार असल्याने ओमला घरातूनच कला आणि समाजप्रबोधनाचा वारसा मिळालेला आहे. आमची तिसरी पिढी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. माझे आजोबा जे.एस. बांदेकर हे एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि संकलक होते. माझ्या पालकांनी कामातून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी लिखाणाद्वारे तर आईने चित्रपट निर्मिती करून प्रबोधनाचे काम केले आहे असे मला वाटते. हाच वारसा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याकडे असलेले ज्ञान आणि माहितीचा उपयोग समाजाच्या तळागाळापर्यंत झाला पाहिजे ही माझ्या वडिलांची विचारसरणी आहे. प्रत्येक माणसाचे व्यक्त होण्याचे माध्यम वेगळे आहे. वडिलांनी लेखनातून चांगल्या गोष्टी पोहोचवल्या तेच मी चित्रपटातून करतो आहे, असे तो म्हणतो.

चित्रपट करताना तान्हाजी मालुसरे यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासताना ‘शोधा म्हणजे सापडेल’ या उक्तीने मी आवश्यक माहिती गोळा करत गेलो. चित्रपट करण्याची जिद्द आणि तीव्र इच्छा असल्यास आपोआप मार्ग सापडतो. त्याप्रमाणे कथानकाची बांधणी करताना मला एकेक मार्ग सापडत गेला. नवीन माणसे भेटली. त्यांनी स्वत:हून मदत केली. या प्रसंगी तान्हाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे यांची भेट घेतली. त्यांनी मालुसरेंवर पीएचडी केल्याने त्यांचे सहकार्य लाभले. शिवाजी महाराज, जिजाबाई, बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील पुस्तकांतून अनेक संदर्भ सापडल्याची माहितीही त्याने दिली. १६७० सालचा काळ पडद्यावर जिवंत करणे हे दिग्दर्शकासाठी एक आव्हानच होते. साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ पडद्यावर साकारण्यासाठी त्या वेळची चित्रे, वेशभूषा, देहबोली, जीवनशैली या गोष्टी समजावून घेतल्या. त्यासाठी ग्रंथालये धुंडाळली तर, युरोप आणि देशभरातील चित्रांचाही अभ्यास केला, अशी आठवण तो सांगतो.

या एक दोन वर्षांत ऐतिहासिक चित्रपट लाट आली म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘फत्तेशिकस्त’, ‘पानिपत’, ‘हिरकणी’, ‘र्फजद’ आणि ‘तान्हाजी’ यासारख्या चित्रपटांतून इतिहासात काळाच्या पडद्याआड गेलेले महान व्यक्तिमत्त्व आणि घटना प्रकाशझोतात येण्यास मदत होईल. त्याच्या मते चित्रपट हे प्रभावी माध्यम असून त्याचा आवाका खूप मोठा आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या घटना आणि व्यक्तिमत्त्वाच्या गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून मांडल्यास एकप्रकारे समाजप्रबोधनच होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

ऐतिहासिक चित्रपट म्हणजे वादांनाही आमंत्रण मिळते. वाद हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असतो. तान्हाजी चित्रपटाच्या वेळीही संघटनांनी आक्षेप घेतला होता. प्रत्येक प्रेक्षकाचा ऐतिहासिक चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आहे. ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त होतात. परंतु यामुळे प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे सांगतानाच चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे आणि याकडे प्रेक्षक सकारात्मक पद्धतीने पाहात असल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला.

मराठी चित्रपट पहिल्यापासूनच आशय आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसरच राहिला आहे. जगभरातील प्रेक्षकांना मराठी चित्रपटांविषयी प्रचंड आदर आहे. आतापर्यंत विविध दिग्दर्शकांनी विचारांच्या कक्षा रुंदावणारे चित्रपट तयार केले आहेत. मराठी चित्रपटात यापुढेही विविध पातळीवर प्रयोग होत राहतील आणि मी याकडे सकारात्मकतेने पाहातो, असे तो म्हणतो. मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नाही, असे बोलले जाते. याबबातीत आपला अनुभव उलटा आहे. ‘लोकमान्य’ चित्रपटाला योग्य थिएटर आणि वेळा मिळाल्या होत्या, असे त्याने सांगितले.

‘नाटक करण्याचा विचार नाही’

चित्रपट हे पहिले प्रेम असलेल्या ओम राऊतचा नाटक करण्याचा विचार नाही. मी अनेक नाटकांत काम केले आहे. परंतु नाटक ही एक वेगळी कला असल्याने तो माझा प्रांत नाही, असेही तो म्हणतो. सध्या वेब विश्वात अनेक आशयघन मालिका येत आहेत. वेब सीरिजमध्ये अभिनय, दिग्दर्शन करण्यास चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार उत्सुक असतो. या क्षेत्राचा फायदा असा की जगभरात तुमच्या कामाची दखल घेतली जाते. कानाकोपऱ्यात तुमचे काम पोहोचते. सध्या तरी बेव सीरिज दिग्दर्शित करणार नाही. चित्रपट हे पहिले प्रेम असल्याने मी त्यातच रमतो, असेही ओमने सांगितले.