सध्या सोशल मीडियावर टाटा ग्रुपच्या मालकीच्या तनिष्क या ब्रॅण्डच्या जाहिरातीवरुन वाद सुरु आहे. दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींच्या लग्नासंदर्भातील भाष्य या जाहिरातीमध्ये करण्यात आल्याने सोशल मीडियावर या जाहिरासंदर्भात अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. एक हिंदू तरुणी लग्न करुन मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्यानंतर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामधील गोष्ट या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र हा लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावरुन #BoycottTanishq ची हाक दिल्यानंतर ही वादग्रस्त जाहिरात कंपनीने मागे घेतली आहे. मात्र त्यानंतरही हे प्रकरण शांत झालेलं नाही. आता अभिनेत्री कंगना रणौतने ही जाहिरात अनेक अर्थांनी चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

या जाहिरातीची संकल्पना वाईट नसली तरी अयोग्य पद्धतीने मांडल्याचे मत कंगनाने व्यक्त केलं आहे. “आपल्या श्रद्धांचा स्वीकार केल्याने एक हिंदू मुलगी घाबरत आपल्या सासरच्या व्यक्तींसमोर वावरते. ती घरातील सदस्य नाही का? ति त्यांच्यावर अवलंबून आहे असं का दाखवण्यात आलं आहे? ती स्वत:च्या घरात अशी परकी का वाटत आहे?, लज्जास्पद आहे हे,” असं कंगानाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“ही जाहिरात अनेक पद्धतीने चुकीची वाटते. हिंदू सून मागील बऱ्याच काळापासून तिच्या सासरच्या लोकांबरोबर राहते मात्र जेव्हा ती त्यांना वंशाचा दिवा देणार असते तेव्हा तिचा स्वीकार केला जाते. ती फक्त मुलाला जन्म देण्यासाठी आहे? ही जाहिरात केवळ लव्ह जिहाद नाही तर लिंगभेदाचेही समर्थन करते,” असं कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“एक हिंदू म्हणून हे क्रिएटीव्ह टेररिस्ट आपल्या मनामध्ये काय टाकत असतात याबद्दल आपण जागृक रहायला हवं. याबद्दल आपण विचारपूर्व चर्चा करायला हवी आणि त्यानंतर आपल्याला काही ठराविक विचार करायला भाग पाडलं जातंय का याचा विचार करायला हवा. आपली संस्कृती वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे,” असं कंगनाने शेवटच्या आणि तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लव्ह जिहाद म्हणजे काय?

लव्ह जिहाद हा शब्द हिंदुत्ववादी संघटनांद्वारे आंतर-धार्मिक विवाहासाठी वापरला जातो. त्यांच्या म्हणण्यानुसार की मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यासाठी बळजबरीने किंवा छळ करून स्त्रीयांचे धर्मांतरण होते. या सर्व घटनांनामध्ये महिलांना धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडल्याचा दावा केला जातो. केरळ आणि कर्नाटकमध्ये हिंदू मुलींनी मुस्लिम तरुणांशी लग्न केल्याचे प्रकार काही वर्षापूर्वी समोर आले तेव्हा लव्ह जिहादचा वापर पहिल्यांदा करण्यात आला होता. ही जाहिरात म्हणजे लव्ह जिहादचाचा प्रकार असल्याचा आरोप करत अनेकांनी तनिष्कवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावरुन केली आहे.