बिग बॉसमध्ये जाण्यासाठी तनुश्री दत्ता बेताल वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. तनुश्री दत्ता जे आरोप करत आहेत ते सगळे बिनबुडाचे आहेत त्याला काहीही अर्थ नाही असंही खोपकर यांनी स्पष्ट केलं. २००८ मध्ये जी घटना घडली त्याच्याशी मनसेचा काहीही संबंध नाही. त्यावेळी घडलेल्या एका घटनेनंतर तनुश्री दत्ता यांनी मीडियातील एकाचा कॅमेरा फोडला होता. ज्यानंतर सगळ्या कॅमेरामन्सनी एकत्र येऊन त्यांचा निषेध करत त्यांची गाडी तोडली होती.

२००८ मध्ये झालेल्या या घटनेशी मनसेचा काहीही संबंध नाही असे आरोपही खोपकर यांनी केले. तनुश्री दत्ता सवंग प्रसिद्धीसाठी हे सगळे करत आहेत. मात्र या आरोपांना काहीच अर्थ नाही असंही खोपकर यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याची ज्यांची योग्यता नाही असे लोक बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेताना त्यांचा उल्लेख बाळ ठाकरे असा एकेरी करतात? मनसेने कायमच महिलांचा सन्मान केला आहे. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापूर्वी थोडा विचार करा असंही खोपकर यांनी म्हटलं आहे.